फेडरर – नदाल सामन्याला प्रेक्षकांचा विश्वविक्रम

Roger Federer And Rafael Nadal
  • केपटाऊन येथे रंगला मदतनिधी सामना
  • अब्जोपती बिल गेटस् खेळले फेडररसोबत

केप टाऊन- रॉजर फेडरर फाउंडेशनसाठी मदतनिधी उभारण्याकरिता आयोजित रॉजर फेडरर व राफेल नदाल दरम्यानच्या ‘मैच इन आफ्रिका’ या प्रदर्शनी सामन्याने उपस्थितीचा नवा विश्वविक्रम नोंदवला. आयोजकांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या सामन्याला 51 हजार 954 प्रेक्षक उपस्थित होते.एखाद्या टेनिस सामन्याला लाभलेल्या सर्वाधिक प्रेक्षकसंख्येचा हा विश्वविक्रम आहे. त्यांनी गेल्या नोव्हेंबरात मेक्सिको सिटी येथे खेळल्या गेलेल्या फेडरर आणि अलेक्जेंडर झ्वेरेव्हदरम्यानच्या सामन्याला लाभलेल्या 42 हजार 517 प्रेक्षकांचा विक्रम मोडला.

पाकिस्तानी क्रिकेटपटूसह तिघे जाणार जेलमध्ये

फेडररने हा सामना 6-4, 3-6, 6-3 असा जिंकला. या सामन्यातून रॉजर फेडरर फाउंडेशनला 35 लाख डॉलरचा निधी मिळाला. रॉजर फेडरर फाउंडेशनमार्फत आफ्रिकेतील मुलांसाठी शैक्षणिक व खेळाच्या योजना राबविण्यात येतात. एवढे प्रेक्षक लाभतील अशा सामन्याचा मी भाग असेल असे वाटले नव्हते. अशा प्रतिसादाची तुम्ही स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, असे फेडररने या सामन्यानंतर म्हटले आहे. फूटबॉल विश्वचषकासाठीच्या स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टेनिस इतिहासातील हे दोन सर्वात यशस्वी खेळाडू एकमेकांचा किती आदर करतात आणि त्यांची किती गाढ मैत्री आहे ते दिसून आले. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांचा उत्साहसुध्दा बघण्याजोगा होता. ते नाचत होते, गात होते आणि उत्साह लाटा आणत होते. हा प्रतिसाद विलक्षण आहे, हे प्रेक्षक आणि हे स्टेडियम, हे वातावरण अद्भूत आहे असे नदालने म्हटले. तो ज्युनियर गटात खेळल्यानंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेत खेळला. फेडरर तर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत खेळला.

ही संध्याकाळ अविस्मरणीय आहे. अशा वातावरणात कदाचित आम्हाला पुन्हा कधीच खेळायला मिळणार नाही. यासाठी केपटाऊनच्या लोकांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत अशा भावना नदालने व्यक्त केल्या.

त्याआधी रॉजर फेडरर व अब्जोपती बिल गेटस् यांनी दुहेरीच्या सामन्यात राफेल नदाल व दक्षिण आफ्रिकन कलाकार ट्रेव्हर नोह यांच्यावर विजय मिळवला.

रॉजर फेडरर फाउंडेशनतर्फे आयोजित हा सहावा आणि आफ्रिकेतील पहिला मदतनिधी सामना होता.

टेनिस सामन्याला सर्वाधिक प्रेक्षक

51,954- फेडरर- नदाल : केपटाऊन, दक्षिण आफ्रिका
42,217-रॉजर फेडरर- अलेक्जेंडर झ्वेरेव, मेक्सिको सिटी, मेक्सिको
35,681- सेरेना विल्यम्स- किम क्लायस्टर्स, ब्रुसेल्स, बेल्जियम
30,472- बीली जीन किंग- बाबी रिग्ज, ह्युस्टन, अमेरिका