सांगली जिल्ह्यात ऑक्सिजन कमी पडण्याची भीती : जयंत पाटील

सांगली : सांगली (Sangli) शहर परिसरात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. वैद्यकीय सेवा आणि ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने नागरिकातून रोष व्यक्त होत आहे, अशा स्थितीत दस्तुरखुद्द पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगलीत ऑक्सिजन कमी पडण्याची भीती व्यक्त केली आहे.

सांगलीला ऑक्सिजन प्लॅन्ट नाही. कोल्हापूरहून पुरवठा होतो. परंतु तेथे रुग्ण संख्या वाढू लागल्याने तेथेच ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. सांगलीतही रुग्णसंख्या वाढतच निघाली असून, उद्या यंत्रणा असली तरी ऑक्सिजनचा साठा कमी पडण्याची शक्यता आहे, अशी भीती पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

यासाठीच पुणे-मुंबईसह अन्य राज्यातूनही ऑक्सिजन पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीतील समस्त जैन समाजाच्या पुढाकाराने सांगलीत वाळवेकर हॉस्पिटल येथे 50 बेडचे महावीर कोरोना हॉस्पिटल उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन ना. पाटील यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जैन समाजाने पुढाकार घेऊन उभारलेले हे हॉस्पिटल कोरोना उपचारासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. अशा पद्धतीने अन्य समाजाने आदर्श घेऊन आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जि.प. कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर सुरेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, मनपा विरोधी पक्षनेते मैनुद्दीन बागवान, डॉ. रवींद्र वाळवेकर, माजी महापौर प्रशांत मजलेकर, चेंबर्सचे अशोक पाटील, जितेंद्र शहा, विवेक शहा आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER