लाडाची ताई 

Gautami Deshpande

” माझा होशील ना ” या मालिकेतून घराघरात पोहचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री ” गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) “गौतमी अल्पावधीतच टेलिव्हिजन क्षेत्रात प्रसिद्ध झाली. सगळेच तिला मृण्मयी ची बहीण म्हणून ओळखायचे पण आता गौतमी ने मालिका क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख संपादन केली आहे. ऑन स्क्रीन या बहिणी अनेक इंटरव्ह्यू मधून प्रेक्षकांना दिसल्या आहेत पण ऑफ स्क्रीन त्यांची केमिस्ट्री काही औरच आहे. सारे तुझ्याच साठी या मालिकेतून गौतमी ने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आणि आता लीड भूमिका मिळवून प्रेक्षकांची मन जिंकून घेतली.

इंजिनिअरिंग करून अभिनयात पदार्पण करणाऱ्या गौतमी देशपांडे सोबत च्या या खास गप्पा….

” लाडाची ताई “

माझं आणि ताईच नातं हे खूप भन्नाट आहे. आम्ही दोघी एकमेकींना समजून घेत असतो. अनेकदा ती माझी सपोर्ट सिस्टीम म्हणून उभी असते. आयुष्यात खूप जास्त महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ताई आहे. ताई प्रत्येक परिस्थितीत माझ्या सोबत खंबीर पणे उभी असते. कधीतरी भाऊ , आई , एक उत्तम मैत्रीण अशी अनेक नाती आम्ही सोबत निभावत असतो.

” मेकॅनिकल इंजिनिअर ते अभिनेत्री “

अभिनयात यायचं हे ठरवलं नव्हत मी इंजिनिअरिंग केलं आहे तर मी एका चांगल्या नामांकित कंपनीत काम केलंय. आवड म्हणून अभिनयात काहीतरी करून बघूया म्हणून मी या क्षेत्रात आली. अभिनयात आपण काहीतरी करू शकतो असं मला वाटलं म्हणून अभिनयात आले. या क्षेत्रात येण्यासाठी ताईने खूप पाठींबा दिला आहे ती नेहमी सांगते तुला ज्यात आनंद मिळतो तू तेच कर.

” कौतुकाची  थाप “

माझ्या प्रत्येक कामाचा तिला खूप अभिमान असतो. जेव्हा अभिनय क्षेत्रात मला पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा माझ्यापेक्षा जास्त ताई खुश होती.तिला या गोष्टीचा प्रचंड आनंद झाला होता. माझ्यापेक्षा नेहमीच तिला खूप कौतुक असत. अभिनयात माझा गुरू ती नक्कीच आहे पण अनेकदा तिच्या कडून खूप गोष्टी शिकायला मिळतात. माझं पहिलं काम बघून तिला खूप जास्त आनंद झाला होता तिला जमेल तसं ती माझं काम बघत असते आणि मला गोष्टी सांगत असते.

अभिनयात आम्हा दोघींना एक नैसर्गिक अभिनय करण्याची आवड आहे त्यामुळे ती मला फार सल्ले देत नाही आमची विचार प्रणाली सारखी आहे त्यामुळे आमचे विचार हे पटकन जुळतात. नैसर्गिक अभिनय करण्याकडे आमच्या दोघीच कल असतो त्यामुळे आम्ही दोघी एकमेकींना कधीच फार सल्ले देत नाही.

” ताईसोबत काम करायचं “

अभिनयात ताई सोबत मला काम करायला नक्की आवडेल. पण ज्या व्यक्तीला आपण आदर्श मानतो त्या व्यक्ती सोबत काम करण्याच थोडं दडपण असत आणि आदर युक्त भीती देखील असते. ताई सोबत काम करण्याची माझी इच्छा आहे.भविष्यात नक्कीच आम्ही कधीतरी सोबत काम करू. ताईच्या दिग्दर्शना खाली ज्या दिवशी मला काम करायला मिळेल तेव्हा मी खूप उत्तम काम करतेय असं मला वाटेल. ताईची काम करण्याची शैली ही खुप छान आहे त्यामुळे मला नक्कीच ताई सोबत काम करायला आवडेल.

ताईचं लग्न झाल्यामुळे आमच्या नात्यात असा फार फरक नाही पडला कारण ताईच्या लग्नाच्या दुरऱ्या दिवशी मी ताई सोबत राहायला गेले त्यामुळे विरह असा काही घडला नाही. खूपदा कामामुळे आम्ही सोबत राहतो त्यामुळे आमचं बॉण्ड आहे तसाच आहे. स्वप्नील दादा मुळे आमची मस्त टीम आहे त्यामुळे ताई आणि आमच्या नात्यात एक छान बॉण्ड आहे. अभिनयाच्या जोरावर मालिकेत पदार्पण करून स्वतःची वेगळी ओळख संपादन करणाऱ्या गौतमी देशपांडे ला खूप खूप शुभेच्छा !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER