‘फत्तेशिकस्त’ चित्रपट भारतीय सेनाच्या संग्रहात

मुंबई :  दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं चांगली कमाई केली. शिवरायांच्या कुशल युद्धनीतीचं दर्शन या चित्रपटातून इतिहासप्रेमींना घडलं. अशा या चित्रपटाला आणखी एक सन्मान मिळाला असून ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाचा ‘मराठा लाइट इन्फंट्री’मध्ये समावेश करण्यात आला आहे. सैन्यदलातील संग्रहात समाविष्ट होणारा ‘फत्तेशिकस्त’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.

‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानं फत्ते केलेल्या एका थरारक मोहिमेवर आधारित आहे. चित्रपट पाहताना शिवकालीन रोमांचकारी सर्जिकल स्ट्राईकची आठवण होते.

चित्रपटाच्या संग्रहातील समावेशाबाबत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना विचारले असता, ‘सैनिकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने निर्मात्यांनी बेळगाव येथील मराठा लाईट इन्फण्ट्री येथील प्रशिक्षण वर्गात चित्रपट दाखवला.

चित्रपट पाहिल्यानंतर शिवरायांच्या युद्धनीतीचा अभ्यास मराठा बटालियनमधील सैनिकांना व्हावा या हेतूने या चित्रपटाचा समावेश संग्रहात करावा, असे मराठा लाईट इन्फण्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले.’ हा चित्रपट बेळगावच्या ‘दि मराठा लाईट इन्फण्ट्री’ रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर गोविंद कलवाड, डेप्युटी कमांडंट कर्नल पी. एल. जयराम, बेळगावचे समशेर बहाद्दूर हरोलीकर सरकार यांच्या सहकार्याने दाखवण्यात आला.