फादर स्टॅन स्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला

Father Stan Swamy - Maharastra Today
  • भीमा-कोरेगाव, एल्गार परिषद हिंसाचार कटला

मुंबई : सन २०१८ च्या भीमा कोरेगाव-एल्गार परिषद हिंसाचार खटल्यातील आरोपी आणि रांची येथील आदिवासी हक्क कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचा जामीन अर्ज  येथील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने सोमवारी फेटाळला. जेजुईट ख्रिश्चन धर्मगुरु असलेले ८३ वर्षांचे फादर स्वामी गेल्या ऑक्टोबरपासून अटकेत आहेत.  मानवी हक्कांसाठी काम करणार्‍या संघटनांच्या आडून प्रत्यक्षात बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षासाठी काम करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी कायदेशीर मुद्द्यांखेरीज गंभीर आजापणाच्या कारणावरून जामीनासाठी अर्ज केला होता. विशेष ‘एनआयए’ न्यायालयाचे न्यायाधीश डी. ई. कोठिलकर यांनी तो फेटाळला.

फादर स्वामी यांच्यावतीने युक्तिवाद करताना त्यांचे वकील शरीफ शेख यांनी असे सांगितले होते की, फादर स्वामी झारखंडमध्ये ‘पर्सेक्युटेड पोलिटिकल प्रिझनर्स सॉलिडॅरिटी कमिटी’ (PPPSC)  आणि ‘बगाईच’ या दोन स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून सरकार आणि नक्षलवादी या दोघांच्या कैचीत सापडलेल्या आदिवासींसाठी काम करतात. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ओढून ताणून या दोन्ही संस्थांचा व स्वामी यांचा माओवाद्यांशी संबंध जोडणयाचा आटापिटा करत आहे. पण गेल्या चार महिन्यांते ती याचा कोणताही पुरावा सादर करू शकलेली नाही. स्वामी ज्याच्यासाठी काम करतात ते आदिवासी कदाचित माओवाद्याशी संबंधित असतील वा नसतीलही. पण त्याने स्वामी माओवादी ठरत नाहीत.

याउलट ‘एनआयए’च्या वतीने विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर प्रकाश शेट्टी यांनी असा प्रतिवाद केला की, स्वामी यांचा माओवाद्याशी  संबंध दाखविणारे भरपूर पुरावे आहेत. स्वामी आणि आनंद तेलतुंबडे व रोना विल्सन या सहआरोपींनी परस्परांनी पाठविलेल्या १३० ई-मेल संदेशांवरून हे स्पष्ट होते. नक्षलवादाच्या निर्मूलनासाठी सरकारने हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन ग्रीन हंट’वर स्वामी यांनी केलेली टीका हाही ‘एनआयए’ने त्यांच्या विरोधातील मुद्दा म्हणून मांडला होता.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER