टेनिसच्या ज्या स्पर्धा वडिलांनी गाजवल्या, तिथेच आता मुले चमकताहेत

Emilio Gomez-Sebastian Korda

पॕरिसमध्ये (Paris) सुरु असलेल्या फ्रेंच ओपन टेनीस (French Open Tennis) स्पर्धेला तीन खेळाडूंनी विशेष बनवले आहे. एमिलियो गोमेझ, (Emilio Gomez) सेबॕस्टियन कोर्डा (Sebastian Korda) आणि कॕस्पर रुड (Casper Rudd) हे ते तीन खेळाडू आहेत. या तिघांपैकी एकही फार यशस्वी टेनिसपटू नाही की गाजलेला नाही, पण तरीही हे यंदाच्या फ्रेंच ओपनला विशेष ठरवत आहेत हे कसे? ते असे की ह्या तिघांचेही वडील कधीकाळी याच स्पर्धेत खेळले होते आणि आता ही मुले त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत, म्हणजेच टेनिसपटूंची नेक्स्ट जेनरेशन आता फ्रेंच ओपनच्या मैदानांवर आहे.

एमिलियोचे वडील अँडर्स गोमेझ, सेबॕस्टियनचे वडील पीटर कोर्डा हे तर त्यांच्या काळातील सफल टेनिसपटूंपैकी एक होते तर कॕस्परचे वडील ख्रिस्तीयन रुड हेसुध्दा जागतिक क्रमवारीत 39 व्या स्थानापर्यंत पोहोचले होते.

एमिलीयो अँडर्स गोमेझ

इक्वाडोरचे अँडर्स गोमेझ हे तर 30 वर्षांपूर्वी फ्रेंच ओपनचे विजेतेसुध्दा होते. त्यांचा मुलगा एमिलियो हा यंदा पात्रता फेरीतुन मेन ड्रॉसाठी पात्र ठरला आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी टेनिस सोडून देण्याचा विचार केला होता पण आता तो जी स्पर्धा त्याच्या वडिलांनी जिंकली होती त्याच फ्रेंच ओपनमध्ये खेळतोय ही त्याच्या देशात मोठी बातमी बनली आहे. एमिलियोशिवाय त्याची चार भावंडेसुध्दा अमेरिकेत काॕलेज टेनिसच्या दर्जापर्यंत पोहोचले आहेत. या भावंडांमध्ये सर्वात प्रगती केलेल्या एमिलियोने सोमवारी ग्रँड स्लॕम पदार्पणाचा सामना खेळला. त्यात त्याने इटालीच्या लाॕरेन्झो सोनीगोकडून हार पत्करली पण 6-7(6), 6-3, 6-1, 6-7(4), 6-3 असा जवळपास चार तास लढा दिला हे अँडर्स गोमेझ यांनी इक्वाडोरमधील गोयाक्वील येथील आपल्या घरी बसून बघितले.

टेनिस असेच असते पण मी आनंदी आहे. निकाल वेगळा तर आनंद झाला असता पण क्ले कोर्टवर खेळायला त्याला फारसे जमत नाही. पण त्याच्यासाठी पुढचे दिवस चांगले आहेत असे वाटते असे अँडर्स गोमेझ यांनी म्हटले आहे. अँडर्स यांनी 1990 मध्ये आंद्रे अगासीला नमवत फ्रेंच ओपन जिंकली होती.

28 वर्षीय एमिलियोने 2018 मधील निराशाजनक कामगिरीनंतर टेनिसपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता पण इक्वाडोरमध्ये जिंकलेल्या दोन सॕटेलाईट स्पर्धांनी त्याला याखेळात कायम ठेवले. आणि आता पात्रता स्पर्धेच्या तीन फेऱ्या जिंकत तो ग्रँड स्लॕम स्पर्धेत खेळला. क्रमवारीत 155 व्या स्थानी असलेला एमिलियो म्हणतो की, ज्या मैदानांवर माझे वडील जिंकले त्याच मैदानांवर खेळणे माझ्यासाठी खास आहे. मी त्यांच्याएवढा दर्जेदारखेळाडू नाही पण मला मजा आली. मात्र एमिलीयोची तुलना त्याच्या वडिलांशी होत राहील आणि त्या अपेक्षांचे दडपण त्याच्यावर नेहमी राहिल पण हे साहजिकच आहे असे अँडर्स गोमेझ यांना वाटते.

सेबॕस्टियन पीटर कोर्डा

20 वर्षीय अमेरिकन सेबॕस्टियन कोर्डा हा आॕस्ट्रेलियन ओपन विजेत्या आणि फ्रेंच ओपन विजेत्या पीटर कोर्डा यांचा मुलगा. त्याने 2018 च्या आॕस्ट्रेलियन ओपन मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले आहे.

एमिलीयो गोमेझ पहिल्याच फेरीत बाद झाला मात्र सेबॕस्टियनने हा अडथळा पार केला आहे. आता दुसऱ्या फेरीत त्याला जॉन इस्नरशी खेळायचे आहे.

सेबॕस्टियनचे आई वडील, पीटर व रेजायना कोर्डा हे दोघेही झेक गणराज्याचे आघाडीचे टेनीसपटू होते. सेबॕस्टीयनच्या बहिणी जेसिका व नेली ह्या आघाडीच्या व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहेत. त्यांनी गोल्फच्या एलपीजीए स्पर्धा जिंकल्या आहेत.

सेबी नावाने ओळखल्या जाणाऱ्या सेबॕस्टियनने आईस हाॕकीपासून सुरुवात केली आणि वयाच्या 9 व्या वर्षापासून तो टेनिसकडे वळला. त्याचे वडील पीटर हे झेक खेळाडू रादेक स्टेपानेकला प्रशिक्षण द्यायला जायचे तेंव्हा तो त्यांच्यासोबत असायचा. युएस ओपनमध्ये जेंव्हा स्टेपानेक व जोकोवीचचा सामना त्याने पाहिला तेंव्हा तो टेनिसच्या प्रेमात पडला.

पीटर व सेबॕस्टियन, दोघे उंच आणि सडपातळ आहेत. मात्र तो पीटरपेक्षाही काही इंच उंच म्हणजे 6 फूट 5 इंच आहे. पीटर डावखुरे होते. हा त्याच्या आईप्रमाणे उजव्या हाताने खेळतो. पीटर एकाच हाताने बॕकहँड मारायचे, हा दोन्ही हातांचा वापर करतो.

सेबीसुध्दा पहिल्यांदाच फ्रेंच ओपनसाठी पात्र ठरलाय. त्याने पहिल्या फेरीत इटलीच्या आंद्रियास सेप्पीला मात दिली.

कॕस्पर ख्रिस्तियन रुड

21 वर्षीय कॕस्पर रुड हा नाॕवेच्या ख्रिस्तियन रुड यांचा मुलगा. इथे ‘बाप से बेटा सवाई’ अशी गोष्ट आहे. कारण ख्रिस्तीयन हे आॕक्टोबर 1995 मध्ये क्रमवारीत 39 व्या स्थानी होते जे नाॕर्वेच्या टेनिसपटूने एटीपी क्रमवारीत कमावलेले सर्वोच्च स्थान होते, तोआपल्या वडीलांचाच विक्रम कॕस्परने यंदाच फेब्रुवारीत मोडला. ख्रिस्तियन रुड हे 1997 च्या आॕस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीपर्यंत पोहोचले होते आणि फ्रेंच ओपनमध्ये 1995 व 1999 ला त्यांनी तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती.

कॕस्पर हा क्रमवारीत सध्या 25 व्या स्थानी असून एटीपी स्पर्धा जिंकणारा नाॕर्वेचा पहिला खेळाडू आहे. गेल्यावर्षी तो फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला होता आणि आता यंदासुध्दा त्याने विजयी सुरुवात केली आहे. यंदा सलग 20 सामने त्याने जिंकले आहेत. त्याने फ्रेंच ओपन 2020 च्या पहिल्या फेरीत युची सुगिताला सरळ सेटमध्ये मात दिली आहे आणि त्याचा पुढचा सामना आता अमेरिकेच्या टॉमी पॉलशी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER