उपोषण करतेय; सरकारविरोधात एक अवाक्षरही काढणार नाही – पंकजा मुंडे

Pankaja Munde

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाण्याच्या गंभार समस्येसाठी भाजपा नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे आज एकदिवसीय उपोषण करणार आहेत. मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मराठवाड्याचं पाणी आणि इतर प्रश्नावर मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक घेण्याची विनंती त्या मुख्यमंत्र्यांना करणार आहेत. मात्र, उपोषण करत आहे म्हणजे सरकारवर टीका करणार अशातला भाग नाही. आतापर्यंत मी सरकारच्याविरोधात एक अवाक्षरही काढलं नाही आणि काढणारही नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्य़ा आहेत.

पंकजा मुंडेंच्या उपोषणात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचाही सहभाग

मराठवाड्यातील पाण्याच्या भीषण समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण आहे असे पंकजांनी सांगितले. हे उपोषण भाजपा पक्षाच्या वतीने असल्याने, पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते या उपोषणात सहभागी होणार आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेचते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.

औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता हे उपोषण सुरु होणार आहे. किमान अडीच ते तीन हजार कार्यकर्ते उपोषणात सहभागी होतील, असे नियोजन करण्यात येत आहे.