उपोषण हा आत्महत्येचा प्रयत्न नाही

madras HC

चेन्नई : एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी उपोषण करणे हा भारतीय दंड विधानाच्या कलम ३०९ अन्वये आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा होत नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) दिला आहे. पी. चंद्रकुमार आणि अन्य काही लोकांनी त्यांच्या काही मागण्यांसाठी चेन्नई शहरातील पोन्नामळी येथील तहसीलदार कार्यालयाबाहेर आॅगस्ट २०१३ मध्ये १० दिवसांचे उपोषण केले होते. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांचे उपोषण मोडले व त्यांना आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याबद्दल त्यांच्यावर खटला दाखल केला.

या गुन्ह्याची नोंदणी व खटला याविरुद्ध चंद्रकुमार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  केवळ उपोषण करणे हा आत्महत्येचा प्रयत्न करणे होत नाही, असे म्हणून न्या. आनंद व्यंकटेश यांनी ती याचिका मंजूर केली व चंद्रकुमार यांच्यावरील खटला रद्द देला.

न्या. व्यंकटेश यांनी उपोषण करणे हा कलम ३०९ अन्वये गुन्हा का होत नाही, याचे सविस्तर विवेचन केले नाही. परंतु कलम ३०९ मधील भाषा पाहिली असता हे अधिक स्पष्ट होते. यात आत्महत्येचा उद्देश व त्यासाठी सक्रियतेने काही प्रयत्न करणे या दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने आमरण उपोषण सुरु केले तर कदाचित त्याचा प्रयत्न आत्महत्येचा होता, असे म्हणता येईल. कारण मरण येईपर्यंत उपोषण करणे हा त्याचा उद्देश आहे व त्यासाठी उपोषण ही त्याने सक्रियतेने केलेली कृती आहे.

गुन्हा रद्द होऊन पुन्हा अवतरला

वाचकांच्या माहितीसाठी कलम ३०९ विषयी आणखी काही माहिती देणे उदबोधक होईल. सन १८८४ मध्ये भारतीय दंड विधान ब्रिटिशांनी लागू केल्यापासून आत्महत्येचा प्रयत्न करणे (कलम ३०९) व आत्महत्येस प्रवृत्त करणे (कलम ३०६) हे दोन्ही गुन्हे त्यात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सन १८८७ मध्ये, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सन १९८८ मध्ये व सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने १९९४ मध्ये कलम ३०९ घटनाबाह्य ठरवून रद्द केले. त्यामुळे दंड विधानातून आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा वगळला गेला. परंतु मार्च १९९६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हे तिन्ही निकाल चुकीचे ठरवून कलम ३०९ म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करणे या गुन्ह्याची दंड विधानात पुनर्स्थापना केली.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER