‘फास्टॅग’ वाचवणार १२ हजार कोटी

- गडकरींच्या निणर्याचे जबरदस्त स्वागत

Nitin Gadkari

मुंबई : टोल नाक्यांवर स्वयंचलित पद्धतीने ‘फास्टॅग’ अनिवार्य झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या निर्णयाचे जबरदस्त स्वागत केले जात आहे. यामुळे देशाचे तब्बल १२ हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

४८८ राष्ट्रीय महामार्गांवर सरासरी वेटिंग टाइमचा सर्वेक्षण केले असता, त्यामध्ये १९९ प्लाझांवर वेटिंग टाइम ५ ते १० मिनिटे आणि ३२ प्लाझांवर वेटिंग टाइम १० ते २० मिनिटे असल्याचे आढळून आले आहे. राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या ( एनएचएआय) दाव्यानुसार आजपावेतो ७२ लाख ‘फास्टॅग’ची विक्री करण्यात आली आहे.

आता रविवार, १ डिसेंबरपासून चारचाकी वाहनांसाठी ‘फास्टॅग’ अनिवार्य करण्यात आले आहे. टोल प्लाझांवर टोल भरण्यासाठी वाहनांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे दर वर्षी १२ हजार कोटी रुपयांचे इंधन वाया जात असल्याचे या सर्व सर्वेक्षणातून दिसून आले आहे. ‘फास्टॅग’च्या वापरामुळे कोट्यवधींचे इंधन वाचण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

१ डिसेंबरपासून ‘फास्टॅग’चे स्टीकर न लावलेले वाहन ‘फास्टॅग’लेनमधून गेले तर, संबंधित चालकाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. एक डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’ स्टीकरचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. यामुळे वाहनांचा टोल नाक्यांवर ५ ते १५ मिनीटे, असा मोठा वेटिंग टाइम वाचेल. त्यातून देशाचे पेट्रोल-डिझेलमागे खर्च होणारे १२ हजार कोटी रुपयांचे इंधन वाचणार आहे.