जानेवारीपासून सर्व चारचाकी वाहनांना ‘फास्टॅग’ सक्तीचा

fast Tag

नवी दिल्ली :- येत्या १ जानेवारीपासून रस्त्यावर येणार्‍या सर्व चारचाकी वाहनांना ‘फास्टॅग’ लावणे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सक्तीचे केले आहे. यासाठी मंत्रालयाने मोटार वाहन नियमावलीत (Motor Vehicle Rules) दुरुस्ती केली असून तशी अधिसूचना जारी केली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार यामुळे टोल नाक्यांवरील १०० टक्के टोलवसुली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होऊ शकेल आणि वाहनांचा प्रवासही कोणताही खोळंबा न होता होईल.

टोल नाक्यावर टोल वसुलीसाठी वाहन न थांबविताही त्याचा टोल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट वसूल करण्याचे ‘फास्टॅग’ हे साधन आहे. ‘स्टिकर’च्या स्वरूपात असलेला ‘फास्टॅग’ वाहनाच्या पुढच्या काचेवर वरच्या बाजूला लावला जातो. मोबाईल फोनप्रमाणे  ‘फास्टॅग’ मध्ये ठरावीक रक्कम ‘प्री-पेड’ पद्धतीने जमा करून ठेवली जाते. वाहन टोल  नाका ओलांडताना तिथे  बसविलेला स्कॅनर या फास्टॅगचे ‘रीडिंग’ करतो व टोलची देय रक्कम त्यातून वळती करून घेतली जाते. ‘फास्टॅग’मध्ये भरलेली रक्कम संपली की त्यात पुन्हा नवी रक्कम जमा करता येते.

मंत्रालयाने एका पत्रकात म्हटले की, प्रत्यक्ष विक्री व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने ‘फास्टॅग’ देशभर उपलब्ध करण्याची सोय करण्यात आली आहे. ते खरेदी करून वाहनांवर लावण्यासाठी वाहनमालकांना दोन महिन्यांची मुदत आहे. १ डिसेंबर २०१७ पासून नव्याने नोंदणी केल्या जाणार्‍या सर्व चारचाकी वाहनांना ‘फास्टॅग’ लावणे सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे वाहन उत्पादक किंवा विक्रेतेच गाड्या विकताना त्यांना ‘फास्टॅग’ लावूनच त्यांची विक्री करतात. चारचाकी वाहनाला वैध ‘फास्टॅग’ लावलेला असल्याखेरीज त्याचा ‘थर्ड पार्टी’ वाहनविमा मिळणार नाही, असेही बंधन घालण्यात आले आहे. ही तरतूद १ एप्रिल २०१२पासून अमलात येईल, असे मंत्रालयाने कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER