फारुख अब्दुलांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावं – संजय राऊत

Sanjay Raut - Farooq Abdullah

मुंबई : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी शुक्रवारी नॅशनल कॉन्फरन्सच्या एका मोठ्या कार्यक्रमात जम्मू काश्मीरचा जुना दर्जा पुन्हा मिळत नाही तोवर आपण मरणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. यावर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हवं असल्यास फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० (Article 370) लागू करावं, असं ते म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, फारुख अब्दुल्ला यांना देशातून बाहेर पडून पाकिस्तानात कलम ३७० लागू करायचे आहे का? काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करावे, असे कोणताही राष्ट्रभक्त म्हणणार नाही. हे ज्यांना नकोय, त्यांचा पाकिस्तानशी संबंध असेल. परिणामी कलम ३७० पुन्हा लागू करु, अशी वक्तव्ये करणाऱ्यांची डीएनए टेस्ट करायला पाहिजे, असा टोलाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

तसेच कलम ३७० रद्द झाल्याने देशाच्या इतर भागातील उद्योजकांना काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता काश्मीरमध्ये उद्योग क्षेत्राला गती येईल. येथील लोकांना रोजगार मिळतील. काश्मीरची जनता मुख्य प्रवाहात येईल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

दरम्यान, नितीश कुमार (Nitish Kumar) खूप मोठे नेते आहेत. त्यांनी स्वतःचा डाव खेळला आहे. जर एखादा नेता म्हणत असेल की ही त्याची शेवटची निवडणूक आहे. तर त्यांना सन्मानाने निरोप दिला पाहिजे. बिहारची जनता याच संधीची वाट पाहत होती. या निवडणुकीत जनता त्यांना निवृत्त करेल. देशातील जनता ही फार सुजाण आहेत, या देशातही अनेकदा सत्तातंर झालं आहेत. निकाल आल्यानंतर इंदिरा गांधींनी खुर्ची सोडली होती .बिहारमध्ये तब्बल २० वर्षानंतर परिवर्तनाचे वारे दिसत आहे. आता केवळ तेजस्वी यादव यांच्याकडून आशा आहेत. विरोधक जंगलराज येईल, अशी टीका करतात. पण देशात सध्या अनेक ठिकाणी जंगलराज चालत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER