शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकरी आत्महत्या सत्रास सुरुवात: उद्धव ठाकरे

अहमदनगर : उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलेच निशाण्यावर घेतले. शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना शेतकरी आत्महत्या सत्रास सुरुवात झाल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख केला. पारनेर येथे या मतदारसंघात तीन वेळेस आमदार राहिलेले पक्षाचे उमेदवार आणि विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. नगर जिल्ह्यात बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती चार सभांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी घेतलेल्या सभेत युती सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, 16 हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी टीका मंगळवारी याच मैदानावर शरद पवार यांनी केली होती. या टीकेला उद्धव यांनी याच व्यासपीठावरून प्रत्युत्तर देत शेतकरी आत्महत्यांचे सत्र हे शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना सुरू झाल्याचा आरोप केला. आघाडी सरकारने त्यावेळी घेतलेल्या शेतकरी कर्जमाफी मागे शिवसेनेने त्यावेळी सरकारच्या विरोधात केलेली तीव्र आंदोलने असल्याचा दावा केला. तसेच पिक विम्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानेच यंदा दहा लाख शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाल्याचे स्पष्ट केले. या सभेत पारनेरच्या नगराध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आम्ही आता थकल्याचे कारण देत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाचा मुद्दा पुढे केला, यावर ठाकरे यांनी भाषणात हे दोन पक्ष एकत्र येतीलही, पण यांचे आमदार आता दहा तरी निवडून येणार का असा प्रश्न उपस्थित करत खिल्ली उडवली.