शेतकरी म्हटलं की वधूमंडळी दुरूनच पळ काढतात; नवनीत रांणांनी लोकसभेत मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Navneet-Rana

शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या समस्या निर्माण होत आहे. शेतकरी म्हटलं की, स्थळ येत नाहीत. शेतकऱ्याच्या घरी आपल्या मुलीला दोन वेळचं जेवण मिळणार नाही, असा विचार मुलींकडचे करत आहेत. ही परिस्थिती भीषण असल्याचे नवनीत राणा यांनी नमूद केले.


नवी दिल्ली : मोदी सरकार-२ चे दिल्लीत संसदीय अधिवेशन सुरू आहे. विदर्भातील खासदार नवनीत राणा यांनी वैदर्भीयांच्या समस्यांकडे पंतप्रधान मोदींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला आहे. आता त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधून घेतले आहे. नवनीत राणा म्हणाल्या, शहरी भागावर चर्चा होतंच असते; परंतु महाराष्ट्राचा खरा आत्मा असलेल्या शेतकरी आणि ग्रामीण भागावर संसदेत चर्चा होणे आवश्यक आहे.

ग्रामीण भागात व्यवसायाने शेतकरी तरुणांचे लग्नदेखील जमत नाही. शेतक-यांच्या बिकट परिस्थितीचा विचार करता वडील आपली मुलगी शेतक-यांच्या घरी देण्यासाठी नकार देतात. अशा भावनिक मुद्द्याने सुरुवात करून नवनीत राणांनी सभागृहाचे आणि पंतप्रधान मोदींचे लक्ष वेधून घेतले. शेतक-यांच्या आत्महत्या हे राज्यातील जनतेसाठी रोजचा विषय झाला आहे. एकेकाळी महाराष्ट्राची ओळख शेतक-यांचा कृषिप्रधान महाराष्ट्र म्हणून ओळख होती; परंतु, आता महाराष्ट्र राज्य शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे राणा म्हणाल्या. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. देशात मागील ४० वर्षांत साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी ८० हजार शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रातील आहेत. ३३ वर्षांपूर्वी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती.

तेव्हापासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोन पसरल्याचे ननवीत राणा यांनी लोकसभेत सांगितले. यंदाही राज्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाची योग्य किंमत मिळत नाही. तेव्हा राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करावी, यासाठी आपण आदेश द्यावेत, अशी मागणी राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. तसेच, शेतकऱ्यांच्या मुलांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या समस्या निर्माण होत आहे. शेतकरी म्हटलं की, स्थळ येत नाहीत. शेतकऱ्याच्या घरी आपल्या मुलीला दोन वेळचं जेवण मिळणार नाही, असा विचार मुलींकडचे करत आहेत. ही परिस्थिती भीषण असल्याचे नवनीत राणा यांनी नमूद केले.