शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ आज राजभवनावर धडकणार; पवार, उद्धव ठाकरेही सहभागी होणार

Sharad Pawar - Farmers Agitation - Uddhav Thackeray

मुंबई : केंद्राने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात मागील २ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लाल वादळ काल रात्री अखेर मुंबईत दाखल झालं. या महामोर्चात राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या सहभागी झाले असून आज राजभवनावर धडकणार आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पाठिंबा दर्शवला असून, ते दुपारी आंदोलनस्थळाला भेट देणार आहे.

मोर्चाचा पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आझाद मैदानात शेतकऱ्यांचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून हे लाल वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल झालं.सकाळी ११ ते २ या वेळेत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाकडे निघणार आहे. तिन्ही कृषी कायदे आणि चारही श्रम संहिता रद्द करा, वीज विधेयक मागे घ्या आणि शेतकऱ्यांसाठी रास्त हमी भावाचा कायदा करा, या मुख्य मागण्या केल्या जाणार आहेत. तर २६ जानेवारी, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय ध्वजाचे वंदन आणि राष्ट्रगीत गाऊन तसेच शेतकरी-कामगारांचा लढा कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्याच्या निर्धारासह कार्यक्रमाची सांगता होईल, असे किसान सभेने स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER