Farmers Protest : संघटनांनी ठरवले तर आंदोलन संपू शकते; केंद्र चर्चेसाठी पुन्हा तयार

Maharashtra Today

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात(Agriculture Law) शेतकऱ्यांचे आंदोलन(Farmers Protest) सुरू आहे. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीच्या अकरा फेऱ्या निष्फळ ठरल्या. या बैठकांमध्ये जवळपास ४५ तास चर्चा झाली. मात्र, बरेच प्रयत्न करूनही हा मुद्दा मार्गी लागलेला नाही. शेतकरी आणि सरकार सहमत न झाल्याने हा मुद्दा अजूनही सोडवला गेला नाही. अशातच, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomer) यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

नरेंद्र सिंह तोमर यांच्या माहितीनुसार, सरकार आणि शेतकऱ्यांमधील गतिरोधक हटवण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकरी संघटनांनी हा मुद्दा सोडवण्याचा निर्णय घ्यावा. सरकार हा मुद्दा सोडवण्यासाठी मार्ग काढेल. केंद्र चर्चा करण्यासाठी तयार आहे आणि हा मुद्दा सरकारला सोडवायचा आहे, असे आवाहन तोमर यांनी केले.

दिल्लीच्या सीमेवर मागील तीन महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शेतकरी विरोधी असल्याचे सांगत आहेत, तर MSP आणि APMC बाबत लिखीत आश्वासन मागत आहेत. या मुद्द्यावर शेतकरी आणि सरकारमध्ये बऱ्याच बैठका झाल्या मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी MSP होती, आहे आणि राहील, असे आश्वासन दिले आहे. मात्र, यानंतरही शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर २६ मार्च रोजी शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ची हाकही दिली होती.

या दरम्यान शनिवारी (२७ मार्च) पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजपा आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले.

माहितीनुसार, भाजपा आमदार अरुण नारंग राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. मात्र ते येण्याच्या आधीपासूनच संतप्त शेतकरी भाजपा कार्यालयात त्यांची वाट पाहत होते. नारंग या ठिकाणी पोहचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती गर्दी केली आणि त्यांच्यावर शाई फेकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button