…तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती, पवारांचा मोदी सरकारला सणसणीत टोला

Sharad Pawar - Narendra Modi

मुंबई :- ‘मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना रक्त गोठवणाऱ्या थंडीत आंदोलन करण्याची वेळ आली. अण्णासाहेब शिंदे (Annasaheb Shinde) यावेळी असते तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती. त्यांची संवेदना शेती व शेतकऱ्यांशी जुळलेली होती. आजचे राज्यकर्ते त्यातून काही शिकतील अशा प्रकारची अपेक्षा अण्णासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मी करतो’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सणसणीत टोला लगावला.

देशाच्या कृषी क्षेत्रात प्रचंड योगदान देणाऱ्या व सहकार चळवळीला दिशा देणाऱ्या अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सबंध वर्षांत विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. या संकल्पनेची शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी पवार बोलत होते. ‘केंद्रात अनेक वर्षे शेती विभागाचे राज्यमंत्री म्हणून अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वाचा व दृष्टीचा ठसा उमटवला. संशोधनाच्या क्षेत्रावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं व या क्षेत्रातल्या मान्यवरांना त्यात सहभागी करून घेतलं. देशामध्ये हरितक्रांती आणण्यात ज्या लोकांचं योगदान होत त्यात बाबू जगजीवनराम, सी. सुब्रमण्यम यांच्या जोडीने अण्णासाहेब शिंदेंचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. हरितक्रांती प्रत्यक्षात आणण्याच्या उपक्रमात अखंडता आणि सातत्य अण्णासाहेबांमुळेच शक्य झालं’, असे शरद पवार म्हणाले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अण्णासाहेब शिंदे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तर ती गैर होणार नाही. यशवंतराव चव्हाणांना अण्णासाहेबांबद्दल मोठी आस्था होती. त्यांनी अण्णासाहेबांना १९६२ साली नगर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली व विजयी झाल्यानंतर जवाहरलाल नेहरूंना आग्रहाने सांगून कृषी खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सुपूर्द केली. अण्णासाहेब शिंदे आणि चव्हाण प्रतिष्ठानचा घनिष्ठ संबंध आहे. संस्थापकांच्या यादीमध्ये आपल्याला त्यांचं नाव बघायला मिळेल. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष म्हणून काहीकाळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि विविध प्रकारच्या बैठकांना नेतृत्व देण्याचं काम त्यांनी केलं, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

ही बातमी पण वाचा : मोदी सरकारला जे हवे होते तेच घडवून आणले, दिल्ली हिंसाचारावरून शिवसेनेचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER