महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला, ठिकठिकाणी आंदोलन

महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला, ठिकठिकाणी आंदोलन

मुंबई :- केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा वणवा आता महाराष्ट्रातही पोचला आहे. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत कृषी कायद्याला विरोध करतानाच पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. आज राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. घोषणाबाजी करत या आंदोलकांनी केंद्रीय मंत्र्यांच्या पुतळ्यांना जोडे मारो आंदोलन केलं. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलन केल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सोलापुरात माकप नेते नरसय्या आडम यांना ताब्यात घेण्यात आल्याने वातावरण अधिकच तापले होते.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील खंडेश्वरी नाका येथे किसान काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष पराग पाष्टे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी वाडा-भिवंडी मार्गावर ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको केला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी भाजप (BJP) सरकारच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन केलं.

सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी सोलापुरातील संत तुकाराम चौकात जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रास्तारोको केल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी आडम यांच्यासह माकपच्या 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळलं होतं.

ठाणे (Thane) जिल्ह्यातील शहापूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय व सीटू यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली २०००हून अधिक शेतकऱ्यांनी शहापूर एसटी स्टँडवरून मोर्चा काढला. यावेळी शहापूरच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या पंचायत समितीसमोर जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि तहसील समोर उग्र निदर्शने करण्यात आली.

उस्मानाबादमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शांततेत आंदोलन केलं. या आंदोलनात शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपलं गाऱ्हाणं मांडलं.

नाशिकमध्ये आज दुपारी शेतकरी समन्वय समितीचा एल्गार पाहायला मिळाला. समन्वय समितीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याविरोधात जोरजोरात घोषणाबाजी केली. यावेळी कृषी कायदा रद्द करण्याची मागणी करत आंदोलकांनी नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. तर, प्रहार संघटनेने केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र संताप व्यक्त केला.

नाशिकमध्ये किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करून हा संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल रात्रीपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी झाली.

इचलकरंजीमध्येही आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आसूड कडाडला. काँग्रेस, जय किसान शेतकरी संघटना आणि माकपाने आज जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. माकपाने के.एल. मलाबादे चौकात निदर्शने करत रास्ता रोको केला. माकपच्या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी भाजप सरकार चले जावच्या घोषणा देत जेलभरो आंदोलनही केलं.

शेगावमध्ये भाकप आणि किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. शेगावच्या क्रांती चौकात हजारो शेतकऱ्यांनी एकवटून मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन केले. तसेच दिल्लीतील आंदोलनात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने आंदोलकांनी केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

काँग्रेसने आज सकाळापासूनच नागपुरात आंदोलन करून संपूर्ण वातावरण ढवळून काढलं. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाली होते. शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात आक्रमक भूमिका घेत मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि केंद्र सरकारचे पोस्टर जाळले. त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

अकोल्यातही शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचं धरणे आंदोलन सुरू केलं असून या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. दिल्लीत धडक दिलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू केल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टीने नागपुरात आंदोलन सुरू केलं आहे. नागपूरच्या संविधान चौकात हे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचा कृषी कायदा हा शेतकरी विरोधी असून हा कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

ही बातमी पण वाचा : आज राज्यात शेतकरी संघटनांचं आंदोलन, तर राष्ट्रवादीचाही सक्रिय पाठिंबा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER