शेतकरी आंदोलन : घुसखोरी करणाऱ्या प्रतिबंधित संघटनेच्या लोकांना तुरुंगात टाका – टिकैत

Rakesh Tikait - Farmers Protest

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात काही असामाजिक घटक, डावे आणि माओवादी घुसल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे. याला भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी उत्तर दिले – प्रतिबंधित संघटनेचे लोक शेतकरी आंदोलनात घुसले असतील तर त्यांना तुरुंगात डांबा.

केंद्र सरकारने दावा केला आहे की, असामाजिक घटक, डावे आणि माओवाद्यांनी शेतकरी आंदोलन ‘हायजॅक’ केले आहे.

या आरोपाला उत्तर देतांना भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या आंदोलनात कोणी असामाजिक घटक घुसल्याची कल्पना नाही. सरकार म्हणते त्याप्रमाणे काही असामाजिक घटकांनी आमच्या आंदोलनात घुसखोरी केली असेल तर केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांना पकडावे. कोणत्याही प्रतिबंधित संघटनेचे लोक शेतकरी आंदोलनात घुसले असतील, ते आमच्यात वावरत असतील तर त्यांना तुरुंगात डांबायला हवे. असे लोक आंदोलनात कुठे दिसले तर आम्ही स्वतःच त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊ.

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले होते की, हे आंदोलन आता डाव्यांच्या आणि माओवाद्यांच्या हाती गेले आहे. आंदोलन खरोखरच शेतकरी संघटनांनी केले असते तर आतापर्यंतच्या आश्वासनांनंतर ते मागे घेतले गेले असते. अनेक चर्चांनंतरही अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही. त्यांना अनेकदा आश्वासने देण्यात आली, त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयतन केला. परंतु वारंवार आश्वासने देऊनही, त्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊनही, दुर्दैवाने हे आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे.

शेतकरी आंदोलन डाव्यांनी आणि माओवाद्यांनी ‘हायजॅक’ केले आहे. डाव्यांनी, माओवाद्यांनी या आंदोलनात घुसखोरी केली आहे. काही मीडिया रिपोर्ट्स असे सांगतात की, या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये असे काही नेते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. गुन्हेगारी इतिहास असलेले काही नेते या आंदोलनाद्वारे देशात अराजकता पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप गोयल यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER