मुंबईतील शेतकरी मोर्च्याला परवानगी नाही, पोलिसांनी दिला इशारा

Vishwas Nangare Patil - Farmers Protest

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रमधील हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांचं हे ‘लाल वादळ’ आज राजभवनावर धडक देणार आहे. मात्र या मोर्चाला आम्ही परवानगी दिलेली नाही. दक्षिण मुंबईत मोर्चाला परवानगी देता येत‌ नाही, असा माननीय न्यायालयाचा आदेश आहे, असं मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच शेतकऱ्यांनी राज भवनावर जाण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करु, असंही नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलं.

विश्वास नांगरे पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी सांगितलं की, मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र राजभवनला जावं अशी त्यांची‌ इच्छा आहे पण कोर्टाच्या आदेशानं दक्षिण मुंबईत मोर्च्याला परवानगी देता येत‌ नाही, आम्ही त्यांना सर्व कायदेशीर बाबी सांगितल्या आहेत. आम्ही शेतकरी नेत्यांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तसंच आम्ही याच ठिकाणी मोर्चा स्थगित करायला सांगितला आहे. मात्र मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला राजभवनावर जायला हरकत नाही. अशा परिस्थितीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी जर राजभवनाच्या दिशेने जायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करु, असंही नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाच्या (Corona) काळात मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं, असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. त्यासाठी एनजीओ, विविध संस्थानी मास्क पुरवले आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांची काळजी घ्यावी, असेआवाहन करत मोर्चाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल असं नांगरे पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER