शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यातील शेतक-यांच्या कर्जमाफीला उद्यापासून सुरुवात होत असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी यादी जाहीर होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा पत्रपरिषदेत केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज पत्रकार परिषद झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली.

महाविद्यालयीन निवडणुका व्हाव्यात : शरद पवार

मुख्यमंत्री म्हणाले, महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची वचनपूर्ती उद्या होत आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होईल. तीन महिन्या या योजनेची प्रक्रिया पूर्ण होईल. उद्याची यादी शेवटची नसेल. टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर केल्या जातील.

महाविकास आघाडीचे सरकार विरोधकांना नाही, तर जनतेसाठी बांधिल आहे. मात्र, सरकार स्थिर झाले आहे. काम करत आहे यामुळे विरोधकांना पोटदुखी होत आहे. सरकारने केलेल्या नियोजनाप्रमाणे सुरूवातीला प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

गेल्या काही दिवसात चांगले निर्णय घेतले आहेत. सर्व घटकातील जनतेला आधार देण्याच काम केले आहे. सगळे विषय एका फटक्यात सोडवता येणार नाही. अचाट वाटावे म्हणून सुरू करायचे आणि पेलवंत नाही म्हणून उताणे पडायचं हे आमच्या सरकारला जमत नाही. नुसत्या घोषणा नाही, तर हे सरकार कामही करत आहे,” असा टोला ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचे काम सुरू केले आहे. तीन महिन्यात कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल. इतरही कामं सरकार करत आहेत. हे विरोधकांनी हे डोळे उघडे ठेवून बघावे, त्यांचं वय ६ ते १८ वर्ष असते तर त्यांनाही सरकारने चष्मे दिले असते,” असा टोला ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला.