महात्मा गांधी जयंतीपर्यंत शेतकरी आंदोलन सुरूच राहणार; राकेश टिकैत यांची घोषणा

नवी दिल्ली :- केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Agitation) सुरूच आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी संपूर्ण देशभरात चक्का जाम केले. देशभरात झालेल्या या आंदोलनाला कुठलेही गालबोट लागले नसल्याने भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी समाधान व्यक्त केले. तसेच केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरू  असलेले  शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती अर्थात २ ऑक्टोबरपर्यंत सुरू  राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७३ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही या प्रश्नावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही.

दिल्ली आणि उत्तरप्रदेशाची सीमा असलेल्या गाझीपूर सीमेवरील आंदोलनाचे  नेतृत्व राकेश टिकैत करत आहेत. केंद्र सरकार तीनही कृषी कायदे रद्द करेल तेव्हाच आंदोलक शेतकरी आपल्या घरी परततील, असं टिकैत यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे.

शेतकरी आंदोलनात राजकारण केले जात असल्याच्या आरोपावर उत्तर देताना राकेश टिकैत म्हणाले की, या आंदोलनात राजकारण करणारी कोणीही व्यक्ती सहभागी झालेली नाही. रोटी, तिजोरी बंद होऊ नये, यासाठी हे आंदोलन केले जात आहे. शेतकरी कुठेही जाणार नाहीत. २ ऑक्टोबरपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात आंदोलन का केले जात नाही, असा प्रश्न राकेश टिकैत यांना विचारण्यात आला. यावर, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड येथे काही गडबड होऊ शकते, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले, असे राकेश टिकैत यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : शेतकरी आंदोलनावरील एका ट्विटसाठी रिहानाला 100 कोटी रुपये दिल्याचा कंगनाचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER