शरद पवार, राहुल गांधींसह विरोधीपक्षांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार ; शेतकऱ्यांच्या मांडणार व्यथा

Sharad Pawar - Ramnath kovind - Rahul Gandhi

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज (9 डिसेंबर) 14 वा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज (9 डिसेंबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांची भेट घेणार आहेत. पवार यांच्यासह काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi), माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या विरोधीपक्षातील दिग्गजांचे शिष्टमंडळ संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. यावेळी देशात पेटलेल्या शेतकरी आंदोलनावर राष्ट्रपतींसोबत चर्चा होणार आहे.

कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारला निर्देशित करण्याबाबत हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिष्टमंळाकडून करण्यात येईल . कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फक्त पाच नेत्यांनाच भेटीची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या दोन आठवड्यात शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये बैठकीच्या फेऱ्या झडल्या, मात्र त्यातून ठोस तोडगा निघालेला नाही. कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आणि विरोधीपक्षांनी पाठिंबा दिलेल्या ‘भारत बंद’ला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष :
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना आमचा सरसकट विरोध नाही. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला 100 टक्के किंमत मिळाली पाहिजे. त्याबाबत बंधन असलं पाहिजे. नव्या कायद्यात सक्तीचा अभाव आहे. त्याबाबत उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचे , मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER