शेतकरी आंदोलनाचा शाहिदच्या चित्रपटाला फटका

Shahid Kapoor - Jersey - Farmers Protest

केंद्र सरकारने नुकत्याच लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा आता दहावा दिवस आहे. या आंदोलनाचे लोण सगळ्यात जास्त पंजाब आणि हरियाणामध्येच असल्याने तेथील सर्व कामकाज ठप्प पडले आहे. या आंदोलनामुळे पंजाब आणि हरियाणाची राजधानी असलेल्या चंडीगढमध्ये शूटिंग करीत असलेल्या शाहिद कपूरलाही (Shahid Kapoor) त्याच्या सिनेमाचे शूटिंग थांबवावे लागले आहे. आता त्याच्या सिनेमाची संपूर्ण टीम शूटिंग बंद करून उत्तराखंडची राजधानी डेहराडूनला गेली आहे.

दक्षिणेतील सुपरहिट सिनेमा ‘जर्सी’ची याच नावाने रिमेक तयार होत असून यात शाहिद कपूर एका क्रिकेटरची भूमिका साकारीत आहे. खरे तर यावर्षीच हा सिनेमा रिलीज होणार होता परंतु लॉकडाऊनमुळे या सिनेमाचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नव्हते. लॉकडाऊन उठल्यानंतर शाहिदने लगेचच ‘जर्सी’च्या शूटिंगची योजना आखली आणि त्यासाठी चंडीगढची निवड केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात सिनेमाची संपूर्ण टीम चंडीगढला आली आणि त्यांनी शूटिंग सुरु केले होते. परंतु चंडीगढमधील शूटिंग शेड्यूल पूर्ण होण्यापूर्वीच संपूर्ण टीमला शेतकरी आंदोलनामुळे चंडीगढ सोडावे लागले आहे.

शूटिंग शेड्यूलमधील काही दिवसच उरले होते. परंतु शेतकरी आंदोलनामुळे सर्व काही बंद असल्याने शूटिंग करण्यात खूप अडचणी येत होत्या. काही दिवस संपूर्ण युनिट हॉटेलमध्ये बसून राहिले होते. अडचणी पाहून निर्मात्यांनी लगेचच दुसरा मार्ग शोधण्यास सुरुवात केली होती. यातच डेहराडून येथे हवे तसे लोकेशन दिसून आल्याने त्यांनी तेथे जाऊन शूटिंग करण्याची योजना आखली आणि आता सिनेमाचा दिग्दर्शक गौतम टिन्नाणुरी, शाहिद कपूर, मृणाल ठाकुर आणि सिनेमातील अन्य कलाकार आणि तंत्रज्ञांसह संपूर्ण यूनिट उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडूनला गेले आहे. खरे तर हा सिनेमा क्रिकेटवर आधारित असल्याने क्रिकेट स्टेडियममध्ये अनेक सीन्सचे शूटिंग करणे बाकी आहे. त्यामुळे स्टेडियममधील सीन वगळता अन्य सीन्सचे डेहराडूनमध्ये शूटिंग करून सिनेमाचे यूनिट पुन्हा तीन दिवसांच्या स्टेडियममधील शूटिंगसाठी शेतकरी आंदोलन संपल्यानंतर चंडीगढला परतणार असल्याची माहिती सिनेमाशी संबंधित सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER