शेतकरी आंदोलन : ८ दिसेंबरला ‘भारत बंद’

Bharat Band

नवी दिल्ली : गेल्या नऊ दिवसांपासून राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायदा रद्द करा या मागणीवर शेतकरी असून बसले आहे. शेतकऱ्यांची ही मागणी अजून केंद्र सरकारने मान्य केली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी ८ दिसेंबरला “भारत बंद’ करण्याची घोषणा केली आहे. (Farmer leaders call for Bharat Bandh on 8 Dec)

शेतकरी नेत्यांचा आरोप आहे की, नऊ दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत पण सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. सरकार आम्हाला कमी लेखते आहे. सरकारच्या या हेकेखोरपणाचा निषेध म्हणून ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

कृषी कायदा रद्द केल्याशिवाय राहणार नाही

कृषी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नेत्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त केला. सरकार कायद्यात दुरुस्ती करण्यास तयार आहे. एमएसपीवर कायदा बनवायलाही सरकार तयार आहे. पण आम्हाला हा कायदाच नकोय. हा कायदा रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे आम्ही सर्वानुमते ८ डिसेंबर रोजी बंद करण्याचा निर्णय घेतला असून देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करण्यात येईल, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

आंदोलनाविरोधात याचिका

गेल्या नऊ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून त्याविरोधात ऋषभ शर्मा या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नवी दिल्ली आणि नोएडा परिसरात कोरोनाचा धोका असल्याने शेतकऱ्यांना आंदोलन संपवायला सांगा, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाल्याने कोरोनाच्या ‘कम्युनिटी स्प्रेड’चा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ हटविण्यात यावे. शेतकऱ्यांनी रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे एमर्जन्सी/ मेडिकल सर्व्हिसला अडथळा निर्माण होतो आहे. दिल्लीतील मोठ्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी लोक दिल्लीत येतात. या आंदोलनामुळे त्यांना रुग्णालयात जाण्यास अडचणी येत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांनी २६ नोव्हेबरला शेतकऱ्यांना बुराडी निरंकारी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. मात्र, शेतकऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे.

उद्याच्या बैठकीकडे लक्ष

उद्या ५ डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधीची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्या शनिवारी अंतिम फैसला झाला नाही तर दिल्लीतील रस्ते बंद करण्यात येतील. दिल्लीतील भाजीपाला आणि खाद्यपदार्थ विक्रीची दुकानेही बंद करण्यात येतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER