दिल्ली हिंसाचारप्रकरण : राकेश टिकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ जणांवर गुन्हे दाखल

नवी दिल्ली :- कृषी कायद्याच्या विरोधात प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी (२६ जानेवारी) मंगळवारी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीदरम्यान (farmer-tractor-rally) हिंसा भडकली होती. आयोजित ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये राकेश टिकैत, योगेंद्र यादव, मेधा पाटकर यांच्यासह २६ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग ऊर्फ लखा सिधाना हेदेखील दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत.

शेतकरी नेत्यांविरोधात विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ९३ जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तर २०० लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला जात आहे की, पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी जारी केलेल्या एनओसीचे पालन केले गेले नाही.

गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांची नावे

आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास सर्व नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, जममुरी किसान सभा पंजाबचे कुलवंतसिंग संधू, भारतीय किसान सभा डकोडाचे बुटा सिंग यांचा समावेश आहे. कवणलप्रीतसिंग पन्नू, किसान मजदूर संघर्ष समिती सतनामसिंह पन्नू, सुरजितसिंग फूल, जोगिंदरसिंग हरमीतसिंग कादियन, बलवीरसिंग राजेवाल, सतनामसिंग साहनी, डॉ. दर्शन पाल, भगबसिंग मनसा बलविंदर लिओ ओलाक, सतनामसिंग भेरू, बुटासिंग शादिपुर, बलदेवसिंग सिरसा, जगबीरसिंग ताडा, मुकेश चंद्र, सुखपालसिंग दाफर, हरपाल सांगा, कृपालसिंग नटूवाला, राकेश टिकैत, कविता, ऋषी पाल अंबावता, व्हीएम सिंग, प्रेमसिंग गहलोत यांची नावं एफआयआरमध्ये आहेत. गुन्हेगारी कट रचणे, दरोडा, दरोड्याच्या वेळी प्राणघातक शस्त्राचा वापर, खुनाचा प्रयत्न करण्यासारख्या गंभीर कलमांसह एकूण १३ कलमांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER