ग्रामीण भागात कोरोनाच्या मृत्यूपेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्या ६० टक्के जास्त!

Farmers sucide

मुंबई : मार्च ते जून या चार महिन्यात विदर्भ आणि मराठवाडयात ७८० तर उर्वरीत महाराष्ट्रात १०८० अशा एकूण १८६० शेतकर्‍यांनी कर्जबाजरीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. याच काळात ग्रामीण भागात कोरोनामुळे ११०० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. म्हणजे कोरोना साथीच्या बळींपेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

लॉकडाऊनच्या ३ महिन्यांच्या काळात राज्यात ११९८ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. यात, मार्च महिन्यात ५४७, एप्रिलमध्ये ६५१ आणि मे मध्ये ४३७ आत्महत्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी २०१९ ला मार्च ते मे या ३ महिन्यात ६६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या अशी माहिती मदत व पुनर्वसन विभानाने दिली आहे. यातून, शेतकरी लॉकडाऊनच्या काळात जास्त हतबल झाल्याचे दिसते.

नापिकी, शेतीच्या उत्पादनांना हमीभाव न मिळणे, नैसर्गिक आपत्तीत मदत न मिळणे यामुळे हताश होऊन शेतकरी आत्महत्या करत असतात. कर्जबाजारी शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून पीक कर्ज मिळवून देण्यासह इतर आर्थिक मदत तातडीने करण्याची गरज आहे.

रिझर्व्ह बँकेकडून कोणतेही निर्देश नसल्यामुळे सार्वजनिक बँका शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. राज्यात पाऊस चांगला असला तरी शेतकर्‍यांच्या हाती पैसा नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीची कामे उरकण्यासाठी शेतकर्‍याच्या हाती तातडीने पैसा असण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे. धक्कादायक म्हणजे राज्य सरकारने कर्जाच्या यादीमध्ये नमूद केलेल्या शेतकर्‍यांचे कर्ज मंजूर करण्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा नाबार्डमार्फत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अद्याप आदेश देण्यात आलेले नाहीत, असा आरोप एका शेतकरी नेत्याने केला आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत असतात. २००१ ते २०२० या काळात राज्यात ३४,२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक १५२२१ आत्महत्या अमरावती विभागात झाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद विभाग आहे – ७७९१. इतर विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आकडे – नागपूर ४१९०, नाशिक ४०५८, पुणे ११४५ आणि कोकण सर्वात कमी ३०.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER