शेतकरी आत्महत्या : माहितीअभावी आकडेवारी देणे अशक्य; केंद्राचे उत्तर

Farmer

दिल्ली : अनेक राज्य आणि केंद्रसाशित प्रदेशांनी त्यांच्या प्रदेशात झालेल्या शेतकरी आत्महत्यांची माहिती केंद्र सरकारला पाठवली नाही त्यामुळे कृषी क्षेत्राशी संबंधित आत्महत्येमागील कारणांची माहिती देण्यास आम्ही असमर्थ आहोत, असे गृहमंत्रालयाने सोमवारी राज्यसभेत सांगितले.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृतानुसार राष्ट्रीय गुन्हे नोंदणीकरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक राज्ये आणि केंद्र शासितप्रदेशांनी शेतकरी आत्महत्येसंदर्भात काहीही आकडेवारी दिलेली नाही. अनेकदा विचारणा केल्यानंतरही शेतीशी संबंधित शेतकरी, शेतमजूर यांच्या आत्महत्यांची माहिती विभागाला देण्यात आली नाही, असे गृहराज्यमंत्री जी. कृष्णा रेड्डी म्हणालेत. यामुळेच कृषीक्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी केलेल्या आत्महत्येंमागील कारणे सांगण्यास तसेच त्याबद्दलची माहिती प्रकाशित करण्यास आम्ही असमर्थ आहोत, लेखी उत्तरात रेड्डी यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणीकरण विभागाकडील माहितीनुसार २०१९ मध्ये देशात १० हजार २८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २०१८ पेक्षा हा आकडा कमी आहे. २०१८ साली हा आकडा १० हजार ३५७ होता. देशात होणाऱ्या एकूण आत्महत्यांपैकी ७.४ टक्के आत्महत्या या कृषीक्षेत्राशी संबंधित असतात. आत्महत्या करणाऱ्यात ५ हजार ९५७ शेतकरी होते तर ४ हजार ३२४ शेतमजूर होते.

डॉक्टर, मजूर आणि विद्यार्थ्यांसंदर्भातील आकडेवारी उपलब्ध नाही

मागील सोमवारपासून सुरू झालेल्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने लॉकडाउनच्या कालावधीमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला याची माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे करोनाविरुद्ध दोन हात करणारे पहिल्या फळीतील कोरोनायोद्धा व किती डॉक्टर्स संसर्गामुळे मृत्यूमुखी पडले यासंदर्भातील आकडेवारीही उपलब्ध नाही, असे सरकारने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

vतर शनिवारी डीएमकेच्या खासदार कनीमोळी यांनी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये डिजीटल माध्यमांची सोय उपलब्ध नसल्याने नैराश्यात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भातील माहिती सरकारने द्यावी अशी मागणी केली. यावर, शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात आपल्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER