मुलाकडून शाळेत ‘बळीराजा नको करू आत्महत्या’ कविता सादर; दोन तासांनी वडिलाची आत्महत्या

farmer-suicide-Ahmadnagar

अहमदनगर : शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून तिसरीतल्या एका मुलाने कविता रचली आणि शाळेत सादर केली; पण दुर्दैवाची बाब म्हणजे मुलाने कविता सादर केल्याच्या दोन तासांनंतरच शेतकरी असलेल्या वडिलाने आत्महत्या केल्याची काळीज पिळून टाकणारी घटना अहमदनर येथे घडली. मराठी भाषादिनानिमित्ताने जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका तिसरीत शिकणाऱ्या प्रशांत नावाच्या विद्यार्थ्याने ‘शेतकरी मायबापा आत्महत्या करू नको रे’ ही कविता सादर करत आवाहन केलं.

मात्र, त्यानंतर अवघ्या दोनच तासांमध्ये त्याला आपल्या शेतकरी वडिलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेबद्दल परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. भारजवाडी या ठिकाणी हनुमाननगर येथे तिसऱ्या वर्गात प्रशांत बटुळे हा विद्यार्थी शिकतो. प्रशांतने गुरुवारी (२७ फेब्रुवारी) आपल्या शाळेत ‘शेतकरी मायबापा आत्महत्या करू नको रे’ ही कविता सादर केली. शेतकऱ्याने आत्महत्या करू नये यासाठी त्याने ही कविता रचली होती. काही वेळातच ही कविता सोशल मीडियावर व्हायरलही झाली.

मात्र, त्यानंतर दोनच तासांनी त्याच्या शेतकरी वडिलाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने ट्रॅक्टर आणि शेतीसाठी बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे. आपण ज्या शेतकरी समूहाला आत्महत्या न करण्याचं आवाहन करत होतो, त्याच शेतकरी समूहातील आपल्या वडिलांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. या घटनेने तिसरीमध्ये शिकणारा प्रशांत पूर्ण हादरून गेला आहे. आपल्यावर प्रेम करणारे ‘पप्पा’ आता नाहीत, हे स्वीकारताना त्याला आपल्या बाबांनी हा निर्णय का घेतला याचं उत्तर मिळत नाही आहे. दैनंदिन व्यवहारांपासून दूर बालपण जगणाऱ्या या निरागस प्रशांतला बसलेला हा धक्का अनेकांच्या काळजीचा विषय झाला आहे. सोशल मीडियावरही त्याच्याबद्दल अनेक जण हीच वेदना व्यक्त करत आहेत.

शातंता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत ९ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश