एका एकरात १३० टन ऊसाचं उत्पन्न घेणारा शेतकरी !

ऊस पट्टा म्हणलं की सांगली जिल्हा डोळ्यासमोर येतोच. ऊसाचं उत्पादन (sugarcane), कारखानदारी आणि महाराष्ट्रातले मात्तब्बर नेते याच जिल्ह्यातून येतात. सांगली (Sangli district) तसा राजकीयदृष्ट्या कायम चर्चेत असणारा जिल्हा. पण या जिल्ह्यातील एका तरूणांची सध्या सगळ्याच माध्यमांत जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचं नाव आहे अमर पाटील. त्यांचं नाव चर्चेत असण्यामागं कारणही तसंच आहे, कारण अमर पाटील यांनी आपल्या शेतीत एका एकरात १३० टन ऊसाचं उत्पादन घेऊन एक रेकॉर्डच आपल्या नावावर करून घेतलाय.

शेतकऱ्याने ठरवलं तर काहीही शक्य आहे.

सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी गावात अमर पाटील शेती करतात. प्रयोगशीलता आणि चिकाटीच्या जोरावर त्यांचा कृषी क्षेत्रात म्हणजे त्यातल्या त्यात ऊस उत्पादनात त्यांचं चांगलच नाव झालं आहे.

तसं पाहिलं तर सांगली जिल्हा असला तरी त्यांच्या गावात पाहिजे तसं पाणी नव्हतं परंतु सिंचन योजना, विहीर यांच्यामुळं त्यांच्या भागात ऊसाच्या शेती करण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रारंभ झाला.

परंतु पाण्याचं नियोजन हा त्यांच्या ऊस उत्पादनातला एक प्रमुख घटक आहे. खुप पाणी म्हणजे खुप ऊस असा काहीसा अनेक लोकांचा भ्रम असतो. पण अमर पाटील यांनी पाण्याचं काटेकोर नियोजन केलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर पाण्याचा अतिवापराचा एक आरोप होत असतो. परंतु अमर पाटील यांनी ड्रीप एरिगेशन सिस्टम वापरून पाण्याचा योग्य वापर करण्याचं ठरवलं.

अमर पाटील यांचा कृषी क्षेत्रातला चांगला अभ्यास आहे. सुरूवातीला ते एकरी ३० ते ४० टनच उत्पादन घेऊ शकत असत. परंतु ड्रीप एरिगेशन सिस्टिमुळं त्यांना १५ टक्के अधिक उत्पादन होऊ लागलं.

नंतर त्यांनी मागे वळून पाहिलच नाही. ऊस उत्पादनातील अनेक बारकावे, तांत्रिक माहिती, कृषी क्षेत्रातील माहिती त्यांनी गोळा करायला सुरवात केली. ऊसावर पडणारे रोग, त्यामुळे पिकांच्या वाढीवर होणारा परिणाम याचाही त्यांनी अभ्यास केला. या सर्वांचा अभ्यास त्यांनी अमलात आणत २०१३ साली ७० टनापर्यंत उत्पादन घेतलं.

मग त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जमिनीची गुणवत्ता वाढवणं. विविध आंतरपीक घेणं. असे अनेक प्रयोग ते करत राहिले. या सर्व प्रवासात दिवसागणिक ते ऊसशेती मधील एखाद्या संशोधकासारखे झपाटून काम करू लागले. त्यांनी जमिनीच्या उत्पादक क्षमतेवरही विशेष काम केलं. जमिनीचा पिएचचा स्तर जसाजसा बदलतो त्याचा पिकांवर व उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे जमिनीचा पोत सुधरावा म्हणून त्यांनी अनेक प्रयोग केले. त्याची तंत्रशुद्ध अमंलबजावणी केली. नदीच्या पाण्यातील क्षारामुळं जमिनीच्या गुणवत्तेवर परिणाम होतो म्हणून त्यांनी ताज पाणी वापरायला सुरूवात केली.

जमिनीचे पोषक तत्वे वाढवण्यासाठी त्यांनी इंटर क्रॉपिंगची पद्धत सुरू केली. यात त्यांनी हरबरा,हळद, मिरची, सोयाबीन असे पीकं घेतले. त्यांनी यात सेंद्रीय खतांचाही वापर केला. असे अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यानंतर त्यांच्या मेहनतीला फळ येत गेलं. २०१७ साली त्यांनी १०० टन ऊसाचं उत्पादन घेतलं. नंतर त्यांनी कालांतरांने १३० टनाचा टप्पाही गाठला.

त्यांना व्हीएसआय संस्थेचा, राजारामबापू साखर कारखान्याचा आणि महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतकरी पुरस्कारही मिळालेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER