फरहा खानचा सत्ते पे सत्ता बासनात

Satte Pe Satta -Farah Khan

शाहरुख खानसोबत हॅप्पी न्यू इयर सिनेमा केल्यानंतर फरहाने काही कथा घेऊन तिच्या आवडत्या कलाकारांशी संपर्क करून नव्या सिनेमाची घोषणा करण्याची योजना आखली होती. मात्र कलाकारांना तिच्या कथा न आवडल्याने कोणीही तिला होकार दिला नव्हता. त्यानंतर फरहाने अमिताभ बच्चनचा सुपरहिट सिनेमा ‘सत्ते पे सत्ता’ची (Satte Pe Satta)रिमेक करण्याची योजना आखली. यासाठीही तिने खूप हातपाय मारले पण तिची ही योजनाही काही सफल होऊ शकली नाही त्यामुळे फरहाला आता सत्ते पे सत्ताच्या रिमेकची योजना बासनात गुंडाळून ठेवावी लागत आहे.

मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा, डेव्हिड धवन यांच्या शैलीनुसार प्रेक्षकांचे संपूर्ण मनोरंजन करणारी दिग्दर्शिका म्हणून फरहा खानला ओळखले जाते. सुरुवातीचे तिचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले होते. कोरियोग्राफर असलेल्या फरहाने 2003 मध्ये ‘मैं हूं ना’ सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उडी घेतली होती. शाहरुख खान अभिनीत हा सिनेमा खूप चालला होता. त्यानंतर 2007 मध्ये आलेला शाहरुख आणि दिपीका पदुकोणचा ‘ओम शांती ओम’ही बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला होता. परंतु त्यानंतर 2010 मध्ये अक्षयकुमारसोबत आलेला ‘तीस मार खां’ आणि 2014 मध्ये पुन्हा शाहरुखसोबत तयार केलेला हॅप्पी न्यू ईयर बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप झाले होते. त्यानंतर गेल्या 6 वर्षात फरहाने एकही सिनेमा बनवला नाही.

त्यानंतर फरहाने ‘सत्ते पे सत्ता’ च्या रिमेकची योजना आखली यासाठी फरहाने सर्वप्रथम ऋतिक रोशनला या सिनेमासाठी विचारले. पण ऋतिकने तिला होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही. ऋतिककडून उत्तर न आल्याने फरहाने अक्षयकुमारला विचारले. पण फरहासोबत तीस मार खां हा अपयशी चित्रपट दिलेला असल्याने अक्षयनेही तिला नकार दिला. तेव्हा अखेर फरहाने तिचा आवडता नायक शाहरुखला विचारले. पण शाहरुखही हिटच्या शोधात असल्याने तो फरहासोबत रिस्क घेऊ इच्छित नव्हता. म्हणून त्याने फरहाला नकार दिला. नवीन कलाकार घेतल्यास फायनांसर पुढे येणार नाहीत याची जाणीव झाल्याने आता फरहाने या सिनेमा बासनात गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER