
बाहुबली सिनेमाने संपूर्ण देशभरात लोकप्रिय झालेल्या प्रभासचा नवा सिनेमा ’राधे श्याम’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘बाहुबली’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box office) कमाईचा विक्रम केला होता. त्यानंतर त्याने ‘साहो’ सिनेमा केला होता जो बऱ्यापैकी चालला होता. आता तो रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ या भव्य सिनेमातही प्रभू श्रीरामांची भूमिका साकारीत आहे. त्याचा ‘राधे श्याम’ हा नवा सिनेमा पूर्ण झाला असून दोन दिवसांपूर्वीच या सिनेमाचा पहिला टीझर रिलीज झाला होता. टीझरमध्ये प्रभासचे (Prabhas) रोमँटिक रूप प्रेक्षकांना खूपच भावले आहे. अशा या यशस्वी आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम करणाऱ्या प्रभासच्या डोक्यावर 1000 कोटींचे कर्ज आहे. हे वाक्य वाचून तुम्हाला धक्काच बसला असेल. जो नायक कोट्यावधी रुपये कमवतो त्याच्या डोक्यावर इतके कर्ज कसे असेल पण हे खरे आहे.
सिनेमात काम करण्यासोबतच प्रभासची स्वतःच्या दोन निर्मिती संस्था ‘यूव्ही क्रिएशन्स’ आणि ‘व्ही सेल्युलाइड’ आहेत. या दोन्ही कंपन्या सध्या तोट्यात असल्यानेच प्रभासच्या डोक्यावर 1000 कोटींचे कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. प्रभासच्या एका अत्यंत जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी कोरोनामुळे सगळे जग ठप्प पडले होते. सिनेसृष्टीचे सगळे कामही बंद होते आणि अजूनही आहे. प्रभासच्या कंपनीचे कामही बंद पडल्याने त्याला खूप तोटा झाला आहे. त्याचे काही सिनेमे रिलीज होऊ शकले नाहीत तर काही सिनेमाचे शूटिंगही सुरु होऊ शकले नाही. सिनेमासाठी प्रभासने कर्ज काढले होते. त्यातच त्याने आता ‘राधे श्याम’ची निर्मितीही सुरु केली आहे. या सिनेमाचे बजेट 250 ते 300 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यात त्याची नायिका पूजा हेगडे आहे. या सिनेमासोबतच प्रभास अजून दोन सिनेमे करीत आहे. या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्या डोक्यावर कर्ज झालेले आहे. मात्र 2021 मध्ये त्याचे ‘सालार’, ‘आदिपुरुष’ आणि नाग अश्वनिचा मल्टीस्टारर सायफाय असे चार-पाच मोठे सिनेमे रिलीज होणार असल्याने तो हे सगळे कर्ज फेडू शकेल असेही प्रभासच्या या मित्राने सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला