कुटुंबातील भांडण रस्त्यावर येऊ द्यायचे नसते : चंद्रकांत पाटील यांचा समजूत घालण्याचा प्रयत्न

Eknath Khadse-Chandrakant Patil

परळी : महादेव जानकर आणि एकनाथ खडसे यांनी व्यासपीठावर बसलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबामध्ये भांडण झाले तर रस्त्यावर येऊन भांडायचे नसते, असे म्हणत एकनाथ खडसे यांच्यासह सर्वच नाराज नेत्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. चुका या पक्षाकडून नव्हे तर माणसांकडून झाल्या. त्यामुळे पक्षावर राग कशासाठी काढता? आता आणखी बोलून जखमा करू नका, असे चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना उद्देशून म्हटले.

पंकजाताई पक्ष सोडणार नाही, पण माझा भरवसा करू नका : एकनाथ खडसे

चंद्रकांतदादा गुरुवारी परळीच्या गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. खडसे यांनी तर भाजपच्या राज्यातील नेतृत्वाचे पद्धतशीर वाभाडे काढले. तसेच आता मी पक्षात राहीन, याचा भरवसा धरू नका, असा इशाराही खडसे यांनी दिला.

पाटील म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या कामाची जाणीव भाजपला अजूनही आहेच. त्यामुळेच मी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहण्यासाठी इथे आलो आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच भाजप सर्व समाजाचा पक्ष झाला. रोहिणी खडसे यांचा फार थोड्या मतांनी पराभव झाला. त्यामुळे खडसे यांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल. त्यावर उत्तरही शोधली जातील आणि भविष्यात तशी वेळ येणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.