
महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा लाभलेला आहे. वारकरी संप्रदायामुळे आणि संत परंपरेमुळे महाराष्ट्राकडे बघण्याची इतर राज्यांची दृष्टीही वेगळी आहे. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे आणि इतर सर्व राज्यांमधे महाराष्ट्राचं स्थान आहे तसंच पुण्याचं स्थान महाराष्ट्रातल्या शहरांमधे आहे.
पुण्यामधे संत ज्ञानेश्वरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेक संतांची राष्ट्रपुरुषांची तसंच महात्मा फुले, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक अशा धुरिणांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम पुणे शहरानं शतकानुशतके केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्याची सुरुवातही पुण्यातूनच झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तसेच नंतरही पुणं हे सत्तेचं केंद्र बनलं होतं. त्यानंतर पेशवाईच्या कार्यकाळातही पुणं हीच मराठा स्वराज्याची राजधानी राहिली होती. त्यानंतर देश परतंत्र झाल्यानंतरही ब्रिटिशांविरुद्धच्या असंतोषाचं आणि स्वातंत्र्यलढ्याचं केंद्र पुणंच होतं.
स्वातंत्र्योत्तर काळातही स्वराज्याचं सुराज्य करण्याच्या प्रयत्नात पुणं आघाडीवर राहिलं आहे. टेल्को, बजाजसारख्या कारखान्यांमुळे पुण्याचं नाव औद्योगिक क्षेत्रातही देशाच्या नकाशावर गेलं. अटोमोबाईल क्रांतीच्या व त्यानंतरच्या विकासात पुण्यानं आज सर्वाधिक दुचाकीगाड्या असलेलं शहर हा लौकिक मिळवला आहे. वाहन उद्योगातल्या प्रगतीनंतरच्या काळात माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान क्षेत्रातही पुण्यानं मुसंडी मारली. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, भारतीय हवामानशास्त्र संस्था, संरक्षण सशोधन विकास संघटनेच्या प्रमुख प्रयोगशाळा, आंतरविद्यापीठीय खगोलभोतिकी केंद्र किंवा आयुका, जीयंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप किंवा जीएमआरटीची महाकाय दुर्बीण, प्रगत संगणन विकास केंद्र किंवा सी-डँक, नँशनल सेंटरफॉर सेल सायन्स म्हणजेच राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्था यासह अनेक संशोधन संस्था, केंद्रं पुण्यात कार्यरत आहेत. संरक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांची पंढरी समजली जाणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएदेखील पुण्यात आहे. त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण क्षेत्रातही पुणं कायम आघाडीवर राहिलं आहे.
दुचाकींचं शहर, आयटी-बीटीचं शहर, पेन्शनरांचं पुणं याबरोबरच अलिकडच्या काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचं केंद्र हाही लौकिक पुण्यानं मिळवला आहे. पुण्यातल्या क्लासेसमधून हे मार्गदर्शन घेऊन आयएएस किंवा एमपीएससी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्याही गेल्या काही वर्षात वाढलीय. त्यामुळेच पुण्यामधे साधारणपणे दहा लाखाच्या आसपास पुण्याबाहेरचे विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी वर्षभर असतात. त्याशिवाय १९८०च्या दशकात आलेल्या सगी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांमुळे भारती विद्यापीठ, एमआयटी, सिम्बायोसिस, सिंहगड इन्स्टिट्यूट, व्हीआयटी अशा अनेक संस्था व्यावसायिक शिक्षण देऊ लागल्या. त्यातील काहींचं रूपांतर स्वायत्त संस्था वा विद्यापीठांमधेही झालंय.
या सर्व लौकिकांमधे भर टाकणारी एक नवी ओळख पुणे शहराला आता मिळू पाहतीय. पायाभूत सुविधांची मुबलकता आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता या गोष्टींच्या जोरावर पुण्यानं गुंतवणुकीच्या रँकिंगमधेही अग्रक्रम मिळवला आहे. एकीकडं आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असं हे शहर व्यापार आणि उद्योगातल्या गुंतवणुकीसी मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन झालंय. पुण्यातला जयराज ग्रुप आणि सॉलिटेयर यांनी पुण्यातल्या या विविध वैशिष्ट्यांचा फायदा घेऊन पुण्याला उद्योगांचं माहेरघर बनवण्यासाठी बिबवेवाडी येथे महाट्रेड मार्केट सुरू करायचे ठरवले आहे.
पुण्याला उद्योगाच्या क्षेत्रात जागतिक नकाशावर नेण्यासाठी हे महाट्रेड सेंटर सुरू केले जाणार असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासाला त्यामुळे चालना मिळणार आहे. या केंद्राचे बांधकाम सुरू असून ग्राहकांना एकाच छताखाली कोणतीही विकत घेता येईल, अशा प्रकारचं हे महाट्रेड मार्केट किंवा महाबाजारपेठ पुण्याच्या लौकिकाच्या शिरपेचात आणखी एक तुरा लावणार आहे.
Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला