मंडल अधिकाऱ्याच्या नावावर लाच मागणारा दलाल गजाआड

Bribery

सांगली : मिरज तालुक्यातील संतोषवाडी येथिल तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी मंडल अधिकाऱ्यांच्या नावावर 10 हजार रूपयाची लाच मागणारा दलाल आनंदा परशुराम पाटील (वय 40, मंगसुळी रस्ता, तांदुळवाडी मळा, आरग) याला शुक्रवारी पहाटे अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पाटील याच्याविरूद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोषवाडी येथे तक्रारदाराची शेतजमिन आहे.

या शेत जमिनीसंदर्भात एकाने तक्रार अर्ज मंडल अधिकारी यांच्याकडे आला होता. हा अर्ज निकाली काढण्यासाठी मंडल अधिकारी यांच्या हाताखाली खासगी काम करणाऱ्या आनंदा पाटील याने तक्रारदाराकडे 15 हजार रूपये लाच मागितली. मंडल अधिकाऱ्यांना 15 हजार रूपये द्यावे लागतील, असे त्याने तक्रारदाराला सांगितले. याबाबत तक्रारदाराने 13 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार आल्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी पडताळणी केली. तेव्हा पाटील याने तक्रारदाराकडे दहा हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदाराला मंडल अधिकारी यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवले. तेव्हा मंडल अधिकारी यांनी लाचेची मागणी केली नाही. तसेच त्यानंतर मंडल अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या पाटील यानेही तक्रारदाराशी संपर्क साधला नाही.

आनंदा पाटील याने लाच घेतली नसली तरी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे लाचेच्या मागणीबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर गुरूवारी (ता.28) उशिरा आनंदा पाटील विरूद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यास अटक केली. लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, कर्मचारी संजय कलगुटगी, अविनाश सागर, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ, राधिका माने, सीमा माने, सारिका साळुखे, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER