सांगलीत जीएसटी अधिकारी नियुक्तीची बनावट पत्रे

Fake letters of appointment of GST .jpg

सांगली : केंद्रीय जीएसटी (GST) फिल्ड वितरण अधिकारीपदी नियुक्ती केल्याची बनावट पत्रे सांगली आणि मिरज येथील काही तरुणांना देण्यात आली आहेत. ती पत्रे घेऊन अनेक तरुण येथील केंद्रीय जीएसटी कार्यालयात गर्दी करीत आहेत. ही पत्रे बनावट असल्याचे समजल्यानंतर फसवणुकीमुळे तरुणांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मिरज कार्यालयातील अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली आहे.

या परिसरातील अनेक तरुणांना ‘अबकारी विभाग रोजगार योजना’ या शीर्षकाच्या लेटरपॅडवर ही नियुक्तीची पत्रे पाठवण्यात आले आहेत. त्यावर ‘फिल्ड वितरण अधिकारी नियुक्ती पत्र’ असाही उल्लेख आहे. या पत्रात मासिक वेतन, पेट्रोल, वाहन, घरभाडे, विमा अशा सुविधाही देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय त्यात रजिस्ट्रेशन शुल्क म्हणून दोन हजार दोनशे रुपये भरावयाच्या सूचना दिल्या आहेत.

रजिस्ट्रेशन शुल्क न भरल्यास तुमचे मागणी पत्र रद्द करण्यात येईल, अशीही सूचना या पत्रात देण्यात आली आहे. ते शुल्क भरण्यासाठी दोन मोबाईल क्रमांक दिले आहेत. त्या क्रमांकावर सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत संपर्क साधावा असेही या पत्रात म्हटले आहे. पत्राच्या शेवटी संचालक म्हणून आशिष गुप्ता नावाने सहीही करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER