फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन व स्नॅपडीलवरील ‘बनावट’ खादी वस्तूंची विक्री झाली बंद

खादी आयोगाने कायदेशीर कारवाईचा बडगा उगारल्याचा परिणाम

Flipkart-Amazon

Ajit Gogateनवी दिल्ली :- खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) या केंद्र सरकारच्या अखत्यारितील स्वायत्त संस्थेने कायदेशीर कारवाईचा बडगा उगारताच अ‍ॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) आणि स्नॅपडील (Snapdeal) यांच्यासह इतरही अनेक प्रमुख ई-व्यापार करणाºया पोर्टल्सनी ‘खादी’ या नावाने उत्पादनांची विक्री करणाऱ्या १६०हूनही अधिक वेबलिंक्स बंद केल्या आहेत.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आका प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देताना सांगितले की, आयोगाच्या नावाने नोंदणी असलेल्या ‘खादी इंडिया’ या ब्रॅण्डच्या नावाचा लबाडीने दुरुपयोग करून भलतीच उत्पादने असली खादी उत्पादने म्हणून विकून आयोगाच्या प्रतिष्ठेस बट्टा लावणाऱ्या तसेच परिणामी खादी कारागिरांच्या रोजगारांवर अप्रत्यक्षपणे गदा आणणाºया एक हजारांहून अधिक व्यापारी फर्म्सना कादेशीर कारवाईचा बडगा उगारण्याच्या नोटिसा पाठविल्यानंतर हा परिणाम झाला आहे.

आयोगाच्या पत्रकानुसार आयोगाने कायदेशीर नोटीस दिल्यानंतर ‘खादी ग्लोबल’नेही खादी उत्पादनांची विक्री करणारी त्यांची वेबसाइट बंद केली असून ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्राम इत्यादी समाजमाध्यमांवरील पेजेसही बंद केली असून त्यावरील ‘खादी’ या ब्रॅण्ड नावाचा उल्लेख अससेला सर्व मजकूर काढून टाकण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितली आहे.

या खेरीज या कारवाईनंतर ‘बनावट’ खादी उत्पादने विकणारी देशभरातील शेकडो दुकानेही बंद झाल्याचा आयोगाचा दावा आहे.

आयोगाच्या म्हणण्यानुसार या ई-कॉमर्स पोर्टर्ल्सवरून ‘खादी उत्पादने’ म्हणून खादी मास्क, हर्बल साबण, शाम्पू, सौंदर्यप्रसाधने, मेंदी, जॅकेट्स, कुडता यासह विविध उत्पादने विकली जात होती. आयोगाने असेही म्हटले आहे की, ज्यांची विक्री आता बंद करण्यात आली आहे अशी बहुतांश उत्पादने आयुष ई-ट्रेडर्स नावाच्या एका फर्मकडून विकली जात होती. ‘वागडची खादी उत्पादने’ या नावाने उत्पादने विकणाºया १४० वेबलिंक्स आपण काढून टाकल्या आहेत, असे या फर्मने आता आयोगास कळविले आहे.

आयोगाने पाच हजार कोटी रुपयांची भरापाई मागमारी नोटीस ‘फॅबइंडिया’लाही काढली असून ते प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आयोगाच्या पत्रकानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीचा अवलंब करण्याचे आवाहन केल्यानंतर देश-विदेशात खादीच्या कपड्यांसह अन्य खादी उत्पादनांच्या मागणीत मोठी वाढ झाली. या संधीचा गैरफायदा घेण्यासाठी खादी या नावाने भलतीय उत्पादने विकणाºयांचे प्रत्यक्ष व्यापारात व ई-व्यापारात पेंव फुटले. याला आळा घालण्यासाठी आयोगाने कायदेतज्ज्ञांची तसेच तंत्रज्ञानाची मदत घेऊन कंबर कसली.

आयोगाने ज्यांना नोटिसा धाडल्या होत्या त्यांना ‘खादी’ उत्पादनांची विक्री बंद करणे किंवा ट्रेडमार्क उल्लंघनाबद्दल भरपाईसाठी कायदेशीर कारवाई तोंड देणे असे दोन पर्याय दिले होते.  हे करत असतानाच ग्राहकांना असली खादी उत्पादने उपलब्ध व्हावीत यासाठी आयोगाने अशा ३०० उत्पादनांच्या आॅनलाइन विक्रीसाठी स्वत:चे स्वतंत्र ई-पोर्टलही काही महिन्यांपासून सुरु केले आहे.
-विनय कुमार सक्सेना, अध्यक्ष, केव्हीआयसी
Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER