यशस्वी कलाकारांचे अयशस्वी भाऊ-बहिण

यशस्वी कलाकारांचे अयशस्वी भाऊ-बहिण

सुशांत सिंहच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवुडमध्ये (Bollywood) नेपोटिझमची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. इंडस्ट्रीत यशस्वी असलेल्यांच्या मुला-मुलींना लगेचच संधी मिळते. मात्र बाहेरच्यांना संधीसाठी प्रचंड झगडावे लागते. अशा या संघर्षातूनच अनेक नवे कलाकार पुढे आले आणि त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. पण यासाठी त्यांना कराव्या लागणाऱ्या संघर्षाची कल्पनाही आपल्याला येणार नाही. पण याचा अर्थ असाही नाही की, यशस्वी असलेल्यांच्या नातेवाईंकाना बॉलिवुडमध्ये यश मिळतेच. बॉलिवुडमध्ये असे अनेक नायक नायिका आहेत ज्यांचे भाऊ वा बहिण बॉलिवुडमध्ये सुपरस्टार पण त्यांना मात्र यशासाठी झगडावे लागले आणि नंतर बॉलिवुडच्या बाहेर जावे लागले.

ट्विंकल खन्ना- रिंकी खन्ना

राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची छोटी मुलगी रिंकी खन्नाने (Rinke Khanna) 1999 मध्ये ‘प्यार में कभी-कभी’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. हा सिनेमा काही विशेष चालला नव्हता. त्यानंतर रिंकीने गोविंदासोबत ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘ये है जलवा’, ‘मुझे कुछ कहना है’ सिनेमातही काम केले. पण तिचा एकही सिनेमा चालला नाही आणि नंतर रिंकीने बॉलिवुडला रामरामच केला. दुसरीकडे रिंकीची मोठी बहिण ट्विंकलने (Twinkle Khanna) मात्र बॉलिवुडमध्ये बऱ्यापैकी यश मिळवले होते. शाहरुख खान, आमिर खानसोबत ट्विंकलने काम केले होते. तिचे सिनेमे हिटही झाले होते. परंतु आई डिंपलप्रमाणे यश मात्र ट्विंकलला मिळवता आले नाही. नंतर ट्विंकलने अक्षयकुमारशी लग्न केले आणि पूर्णपणे सिनेमाला रामराम ठोकला.

शिल्पा शेट्टी- शमिता शेट्टी

शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) बॉलिवुडमध्ये रोनित आणि रोहित रॉय (Rohit Roy) यांच्या नायिकेच्या रुपात बॉलिवुडमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यांचा हा सिनेमा पूर्णत्वाला गेला नाही. त्यानंतर मात्र शिल्पाने बाजीगरमध्ये सेकंड लीड साकारली आणि यश मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिल्पा शेट्टीने अनेक हिट सिनेमे दिले. आजही शिल्पा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते आणि ती योगाचे क्लासेसही घेते. मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत छोटी बहिणीने शमितानेही (Shamita Shetty) 2000 मध्ये मल्टीस्टारर ‘मोहब्बतें’ सिनेमातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. हा सिनेमा हिटही झाला. पण त्याचा शमिताला काहीही फायदा झाला नाही. आज तर शमिताला साईड रोलही कोणी देत नाही.

काजोल देवगन- तनीषा मुखर्जी

काजोलने (Kajol) बॉलिवुडमध्ये सुरुवात वयाच्या 16व्या वर्षी बेखुदी सिनेमातून केली. हा सिनेमा फ्लॉप झाला पण नंतर काजोलने यश चोप्रा आणि करण जोहर कॅम्पमध्ये प्रवेश केला आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ ‘प्यार तो होना ही था’, ‘कुछ कुछ होता है’, ‘फनां’, ‘बाजीगर’ असे अनेक सुपरहिट सिनेमे दिले. काजोल अजूनही सिनेमात काम करीत असून तिला चांगल्या भूमिका ऑफर केल्या जात आहेत. दुसरीकडे काजोलची बहिण तनीषा मुखर्जी (Tanishaa Mukerji) मात्र यशस्वी होऊ शकली नाही. तनीषाने 2003 मध्ये ‘श..’ सिनेमातून बॉलिवुडमध्ये प्रवेश केला होता. हा सिनेमा सुपरफ्लॉप झाला होता. त्यानंतर तनीषाने ‘नील अँड निक्की’, ‘पॉपकॉर्न’ सिनेमात काम केले पण तनिषाला यश मिळाले नाही. काजोलला आताही चांगल्या भूमिका मिळत असताना तनीषाला मात्र छोट्या मोठ्या भूमिका ऑफर केल्या जात आहेत.

मलायका अरोरा- अमृता अरोरा

सलीम खान (Salim Khan) यांच्या खानदानात सून म्हणून गेलेल्या मलायका अरोरा खानने (Malaika Arora) बॉलिवुडमध्ये स्वतःच्या नृत्य आणि ग्लॅमरने चांगलेच यश मिळवले आहे. आजही ती तरुण अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये असून चर्चेतही आहे. ‘छैंया-छैंया’, ‘मुन्नी बदनाम हुई’ अशी अनेक हिट गाणी मलायकावर चित्रित करण्यात आलेली आहेत. काही डांस शोजची जज म्हणूनही मलायका काम करीत आहे. मलायकाच्या पावलावर पाऊल टाकून तिच्या बहिणीने अमृतानेही (Amrita Arora) इंडस्ट्रीत प्रवेश केला. अमृताने फरदीन खानसोबत ‘कितने दूर कितने पास’ सिनेमातून बॉलीवुडमध्ये पाऊल ठेवले होते. परंतु हा सिनेमा सुपरफ्लॉप झाला. त्यानंतर काही सिनेमात अमृता अरोरा दिसली पण त्याला काही अर्थ नव्हता. आज मलायका अजूनही चर्चेत असली तरी अमृता मात्र विस्मरणात गेली आहे.

या यादीत सलमान खान- सोहेल खान, अरबाज खान, आमिर खान-फैसल खान आणि अनिल कपूर- संजय कपूर या भावांचेही नाव घेणे आवश्यक आहे. सलमान खान बॉलिवुडचा अनभिषिक्त सम्राट आहे. मात्र त्याने जसे यश मिळवले तसे यश सोहेल खान आणि अरबाज खान यांना मिळाले नाही. आमिर खान हा बॉलिवुडमध्ये परफेक्शनिस्ट मानला जातो आणि त्याचे सगळे सिनेमे हिट होतात. आमिरने भाऊ फैसलसोबत मेला सिनेमाही केला होता ज्यात ट्विंकल नायिका होती. मात्र तो सिनेमा सुपरफ्लॉप झाला होता. आमिरप्रमाणे सोडा त्याच्या एक टक्काही यश फैसलला मिळाले नाही. असाच काहीसा प्रकार अनिल कपूर आणि संजय कपूर या भावांचाही आहे. अनिल कपूरने अँग्री यंग मॅनपासून विनोदी भूमिका, चरित्र भूमिका साकारून प्रचंड यश मिळवले. अनिल आजही सिनेमात सक्रिय असून त्याला महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. तर दुसरीकडे संजय कपूर मात्र पहिल्या सिनेमापासून यशाच्या प्रतीक्षेत होता तो अजूनही आहे. अनिल कपूरवर जेवढे प्रेम प्रेक्षकांनी केले त्या तुलनेत संजय कपूरला प्रेक्षकांनी स्वीकारलेच नाही.

त्यामुळे केवळ वंशवाद किंवा तुम्ही कोणाचे बहिण भाऊ, मुलगा- मुलगी आहात यावर बॉलिवुडमध्ये यश मिळवता येत नाही. त्यासाठी तुमच्यात काही तरी असावे लागते हेच या उदाहरणांवरून सिद्ध होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER