फाफ डू प्लेसीसची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसीस (Faf du plessis) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. नवा अध्याय सुरू करायची वेळ आली आहे. काही काळासाठी टी-२० क्रिकेटला प्राधान्य असेल, असे आपली निवृत्ती जाहीर करताना त्याने म्हटले आहे. प्लेसीस याने आपल्या ६९ कसोटी सामन्यांपैकी ३६ सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आहे. त्याने फेब्रुवारी २०२० मध्ये कर्णधारपद सोडले होते. नजिकच्या काळात आता दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी सामने नाहीत हे पाहता त्याने म्हटलेय की, नवा अध्याय सुरू करायची वेळ आली आहे. आता २०२१ व २०२२ मधील टी-२० विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून  त्याने टी-२० क्रिकेटकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यातील ऊर्जा जोखण्यात हे वर्ष गेले. सध्या अनिश्चितता आहे; पण या काळाने माझ्यात बऱ्याच अंगाने स्पष्टता आणली आहे. आता नवीन गोष्टी करायची वेळ आली आहे. देशासाठी सर्व प्रकारे क्रिकेट खेळायला मिळणे हा गौरव आहे. पण आता कसोटी क्रिकेटपासून विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. कुणी मला १५ वर्षांपूर्वी सांगितले असते की, मी दक्षिण आफ्रिकेसाठी ६९ कसोटी सामने खेळेल आणि नेतृत्वही करेल तर त्यावर माझा विश्वास बसला नसता, असे त्याने आपली निवृत्ती जाहीर करताना म्हटलेय.

कसोटी कारकिर्दीत अनेकांचे प्रेम व सदिच्छा लाभल्या. चढउतारांनी मला आज मी जो व्यक्ती आहे ते बनवले आहे. त्याने माझे भलेच केले आहे, असेही त्याने म्हटलेय.

३६ वर्षे वय असलेल्या प्लेसीसने २०१२-१३ मध्ये अॕडिलेड कसोटीत पदार्पण साजरे केले होते. पहिल्या कसोटीतच ७८ व नाबाद ११० धावांच्या खेळी करून तो सामनावीर ठरला होता. त्याने आपल्या कारकिर्दीत १० शतकं व २१ अर्धशतकांसह ४१६३ धावा केल्या आहेत.

एबी डीविलीयर्सनंतर २०१६ मध्ये तो दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बनला. त्याने फेब्रुवारी २०२० पर्यंत कर्णधारपद भूषविले. त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने १८ कसोटी सामने जिंकले तर १५ गमावले. यापैकी पहिल्या २७ कसोटीत १७ विजय होते. त्याने १४३ वन डे आणि ५० टी–२० सामनेसुद्धा  खेळले आहेत. तो वन डे व टी-२० क्रिकेटसाठी उपलब्ध राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER