आता तरी कोरोना चाचण्या वाढावा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Uddhav Thackeray & Devendra Fadnavis

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गाचा मासिक दर सप्टेंबर महिन्यात आढळून आला आहे. त्यात जवळजवळ चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरी हव्या त्या प्रमाणात चाचण्यांच्या संख्येत वाढ केली जात नाही. आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असताना आणि पाच महिन्यांचा कालखंड चाचण्या न वाढविण्यात निघून गेला असताना पुन्हा एकदा चाचण्यांवर लक्ष केंद्रित करण्याची विनंती माजी मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चाचण्या वाढविण्यासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करीत असतानाही पाहिजे त्या प्रमाणात चाचण्या वाढविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी संसर्ग कमी होणे सोडून तो अधिकाधिक वाढत आहे. सप्टेंबर २०२० मध्ये आतापर्यंतच्या सहा महिन्यांतील सर्वाधिक संसर्गाचा दर महाराष्ट्रात आढळून आला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात चाचण्यांची संख्या ४२ टक्क्यांनी वाढविल्यानंतर ती आणखी वाढविण्याची गरज होती. पण, सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या तुलनेत केवळ २६ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. जुलैमध्ये प्रतिदिन ३७ हजार ५२८, ऑगस्टमध्ये प्रतिदिन ६४ हजार ८०१ तर सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ८८ हजार २०९ चाचण्या करण्यात आल्या. केंद्र सरकारकडूनसुद्धा चाचण्या वाढविण्यासंबंधी वारंवार सूचना दिल्या जात आहेत.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मा. पंतप्रधान महोदयांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये आपण चाचण्यांची संख्या दीड लाखांपर्यंत वाढविण्याचा विचार बोलून दाखविला. तरीसुद्धा प्रत्यक्षात मात्र दिवसागणिक चाचण्या कमी होत असल्याचे दिसून येते. एकीकडे राज्यात थोड्या तरी अधिक संख्येने चाचण्या केल्या जात आहेत; पण मुंबईत तर स्थिती आणखी भीषण आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल आणि देशाच्या आर्थिक राजधानीचे चक्र पुन्हा कार्यरत करायचे असेल तर मुंबईसारख्या लोकसंख्येतील चाचण्यांचे प्रमाण किती तरी अधिक असायला हवे.

सप्टेंबर महिन्यात दररोज सरासरी केवळ ११ हजार १७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. परिणाम काय झाला? ऑगस्टमध्ये मुंबईचा संसर्ग दर जो १३.६३ टक्के होता, तो सप्टेंबरमध्ये पुन्हा १७.५० टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. याचाच अर्थ चार टक्क्यांनी संसर्ग दर वाढला आहे. जुलै महिन्यातसुद्धा असाच १७.९७ टक्के संसर्ग दर होता. दिल्लीतील दैनंदिन सरासरी चाचण्या आता ४० हजारांच्या वर नेण्यात आल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे. मुंबईला अनेक उपनगरं जोडली आहेत. मुंबईतून कोकणातसुद्धा लोकांचे आवागमन मोठ्या प्रमाणात असते.

त्यामुळे तेथेसुद्धा कमी चाचण्यांमुळे प्रादुर्भावाचा फटका बसतो आहे. मुंबईसह ज्या ज्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, तेथे चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ त्वरित करण्यात यावी. चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी वाया जाणारा प्रत्येक दिवस हा भविष्यात आणखी मोठ्या समस्यांना आमंत्रण देणारा ठरेल, हे लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे. आपण त्यावर योग्य कारवाई कराल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER