फडणवीसांचे निकटवर्तीय खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर! पवारांकडून निमंत्रण?

मुंबई : माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय खासदार संजय काकडे पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चा रंगत आहेत. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पवारांकडून आपल्याला निमंत्रण आल्याची माहिती काकडे यांनी दिली आहे. संजय काकडे जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

लवकरच राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार असून या जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हेही पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करत भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे; मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं करत भाजपला अडचणीत आणलं होतं.

रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ समजणार नाही; पती नंतर पत्नी अमृतांचाही आदित्य ठाकरेंवर पलटवार

त्यामुळे त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यातच उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्यावरून संजय काकडे यांनी प्रश्न उपस्थित केला असून उदयनराजेंचे भाजपसाठी काय योगदान आहे, असा सवाल संजय काकडेंनी उपस्थित केल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, मागील वर्षीदेखील संजय काकडे राष्ट्रवादीत जाणार या चर्चा रंगल्या होत्या; मात्र त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काकडेंची मनधरणी केली होती. परंतु आता पुन्हा एकदा काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते आहे.