मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या वाढवा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडताना दिसून येत आहे. त्यातच मुंबईतील (Mumbai) चाचण्या वाढवा, असा सातत्याने आग्रह करत असतानासुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून केली आहे.

मुंबईत जुलै महिन्यात प्रतिदिन चाचण्यांची संख्या ६,५७४ होती, ती ७,७०९ वर गेली. ही वाढ केवळ १४ टक्के आहे. राज्यात प्रतिदिन चाचण्या जुलैत ३७,५२८ इतक्या झाल्या, ती संख्या वाढून ऑगस्टमध्ये प्रतिदिन ६४,८०१ इतकी झाली.

ही वाढ ४२ टक्के आहे. ऑगस्टचा संसर्ग दर महाराष्ट्रात १८.४४ टक्के इतका होता. तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक आहे. देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणार्‍या राज्यांमध्ये भारताच्या सरासरीपेक्षाही महाराष्ट्र मागे आहे. भारताच्या सरासरीपेक्षा अधिक चाचण्या करणार्‍या राज्यात गोवा (१५८४), आंध्र (१३९१), दिल्ली (९५०), तामिळनाडू (८४७), आसाम (७४८), कर्नाटक (७४०), बिहार (६५०), तेलंगणा (६३७), उत्तराखंड (५९०), हरियाणा (५६३) इतकी आहे. भारताची सरासरी ५४५ इतकी आहे. देशात संसर्गदर देशाच्या तुलनेत कमी असणार्‍या राज्यांतसुद्धा महाराष्ट्र नाही. राजस्थान (४.१८ टक्के), उत्तरप्रदेश (४.५६ टक्के), पंजाब (४.६९ टक्के), मध्यप्रदेश (४.७४ टक्के), गुजरात (५.०१ टक्के), बिहार (५.४४ टक्के), हरियाणा (५.५१ टक्के), ओरिसा (५.७१ टक्के), झारखंड (६.१९ टक्के), गोवा (८.०५ टक्के), तामिळनाडू (८.१० टक्के), भारताचा ८.५७ टक्के तर महाराष्ट्राचा संसर्गदर १९.१५ टक्के इतका आहे. अलीकडेच झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यासंदर्भातसुद्धा काही सूचना त्यांनी या पत्रातून केल्या. महात्मा जनारोग्य योजनेची प्रकरणे त्वरित निकाली काढणे, सातार्‍यात खाटांची क्षमता अधिक वाढवणे, सांगली आणि कोल्हापूर येथील संसर्ग दर, मृत्यूदर नियंत्रणात आणणे, रेमडेसिवीर हे औषध सर्वांना मोफत उपलब्ध करून देणे, अशा सूचनांचा यात समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER