तुकोबाचा अभंग म्हणत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

CM Uddhav Thackeray - Devendra Fadnavis

मुंबई :- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या (Governor Bhagat Singh Koshyari) अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल केला. “कोश्यारींना सरकारने दिलेले भाषण एखादे चौकातले भाषण वाटते. त्यात यशोगाथाच नव्हे, केवळ आणि केवळ व्यथाच दिसतात.” अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) लक्ष्य केले आहे.

“राज्य सरकारने राज्यपालांना दिलेल्या भाषणात आम्ही हे केले आणि ते केले, याचाच उल्लेख केला. कोविड सेंटर्स उभारली, जम्बो कोविड सेंटर्स बांधली, प्रयोगशाळ्या उभारल्या, अशा गोष्टी राज्यपालांच्या भाषणात होत्या. पण आकडेवारी अजिबात नव्हती. सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे किती जणांचे प्राण वाचले, किती जणांच्या चाचण्या झाल्या, याची कोणतीही आकडेवारी सरकारने दिली नाही. किमान या कोविड सेंटर्समुळे किती जणांची घरे भरली, याची तरी माहिती द्यायला हवी होती.” असा टोला फडणवीसांनी दिला. शेतकरी प्रश्न, त्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई, थेट परकीय गुंतवणूक, वीज बिल यासारख्या अनेक विषयांवरून फडणवीसांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. त्यांनी भाषणाच्या शेवटी संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला दिला.

‘नका दंत कथा येथे सांगो कोणी ! कोरडे ते मानी बोल कोण !!
अनुभव येथे पाहिजे साचार ! न चलती चार आम्हांपुढे !!
वरी कोण मानी रसाळ बोलणे ! नाही झाली मने ओळखी तो !!
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी ! राजहंस दोन्ही वेगळाली !!
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ! येर गबाळ्याचे काय काम !!

फडणवीसांनी सांगितली स्टूल खरेदीची गोष्ट
तीन पक्षाचे सरकार अनेक गोष्टींमध्ये दिरंगाई करत आहे. ‘एखादा विभाग स्टूल खरेदीसाठी मंत्रालयाशी पत्रव्यवहार करतो. मग मंत्रालयाकडून त्या विभागाला स्टूलची उंची किती हवी, हे नमूद नसल्याचे पत्रातून कळवते. उंची नमूद केल्यावर स्टूल लाकडी पाहिजे की लोखंडी या फायबरचा याबद्दल मंत्रालयातून विचारणा होते. यावर पत्राने उत्तर दिल्यावर स्टूलाला किती पाय हवेत, असा प्रश्न विचारला जातो. मग पुन्हा स्टूलाचे वजन किती हवे, याची विचारणा होते. शेवटी तो स्टूल विभागाला मिळत नाही. एखादी घटना घडल्यावर स्टूलाबद्दल विचारले जाते. पत्रव्यवहाराचे इतके कागद झाले की, त्याचा आम्ही स्टूल म्हणून वापर करतो.’ असा किस्सा सांगत फडणवीसांनी ठाकरे सरकारचा चिमटा काढला.

ही बातमी पण वाचा : अर्थसंकल्पीय अधिवेशन: सरकारने काम केले असते तर ३० हजार लोकांचे जीव वाचले असते : देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER