‘ठाकरे’ सरकारने बदल्यांचा धंदा सुरू केला; फडणवीसांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल

CM Uddhav Thackeray - Devendra Fadnavis

नागपूर : सध्या राज्यात कोरोनाचे (Corona) संकट अधिकच गडद होत चालले आहे. रुग्णांची आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. कोरोना रोखण्याला प्राधान्य देण्याऐवजी ठाकरे सरकारने राज्यात बदल्यांचा धंदा सुरू केला आहे, अशी जहरी टीका करतानाच एक वर्ष बदल्या नाही केल्या तर काय फरक पडतो, असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला.

पूर्व विदर्भात पुराने थैमान घातलं आहे. पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज विदर्भात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

यावेळी ते म्हणाले की, राज्यात कोरोनाचं संकट अधिकच वाढत चाललं आहे. कोरोनामुळे मृत्युदरही वाढत आहे. अशा वेळी राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. मात्र, ते करण्याऐवजी राज्यातील मंत्री आणि अधिकारी कुणाला कुठे आणि कशी पोस्टिंग मिळेल यात व्यस्त झाले आहेत. कोरोनाच्या काळात बदल्या करणं इतकं महत्त्वाचं आहे का? एक वर्ष बदल्या झाल्या नसत्या तर काय फरक पडला असता? असा सवाल करतानाच राज्यात सध्या बदल्यांचा धंदा सुरू झाला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

तसेच पुण्यातील टीव्ही-९ मराठीचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनानं निधन झालं. एका पत्रकराचा अशा प्रकारे मृत्यू ही दुर्दैवी आणि मनाला धक्का लावून जाणारी गोष्ट आहे. पांडुरंग या चाळिशीतील उमद्या पत्रकाराचा असा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे, अंतर्मुख करायला लावणारा आहे, पत्रकाराची परिस्थिती अशी असेल ती योग्य नाही, याबाबत मी प्रशासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपुरातसुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना प्रसार वाढत चालला आहे. त्याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. मृत्युदर चिंता वाढविणारा आहे. मी पश्चिम महाराष्ट्राचा कोरोनासंदर्भात दौरा केला. टेस्टिंग वाढविण्याची गरज आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिलं, असं फडणवीस यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER