आरक्षणासाठी फडणवीसांनी आमच्यासोबत यावं, त्यांनी नेतृत्व करावं’, संजय राऊतांचे आवाहन

Devendra Fadnavis-Sanjay Raut

मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ बुधवारी रद्दबातल ठरवला. यानंतर राज्यात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यामध्ये राजकारण न करता कशाप्रकारे तोडगा काढता येईल यासाठी पुढे यायला हवं. महाराष्ट्र सरकारला अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. आम्ही हा कायदा मंजूर करण्यासाठी राष्ट्रपतींकडे, केंद्राकडे जाऊ. देवेंद्र फडणवीसांनी आमच्यासोबत यावं, त्यांनी नेतृत्व करावं,” असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना असेल तर मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे एक वर्षांपासून भेटीची वेळ मागत आहेत त्यांना का वेळ मिळत नाही?’ असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायचा अधिकार पंतप्रधानांकडे आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) म्हटलं आहे. आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारवर ढकलत नाही. आम्ही बोट दाखवलं नसून सर्वोच्च न्यायालय बोट दाखवत आहे. आम्हाला बोट, हातही दाखवायचा नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तशी वेळ आमच्यावर आली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

मराठा आरक्षण कोणाला नको आहे? मराठा आरक्षण हे सगळ्यांनाच हवं आहे. चंद्रकांत पाटील, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, अजित पवार या सर्वांना मराठा आरक्षण हवं आहे. त्यामुळे विधानसभेत सर्व पक्षांनी एकमताने ठराव मंजूर केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो मार्ग दाखवला होता त्याच मार्गावर हे सरकार चाललं होतं, त्याच मार्गाने पुढील काम चालू आहे. त्यांनीच नेमलेले वकील कायम आहेत. आता केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र आले पाहिजे. आम्ही पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे जायला तयार आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आमच्यासोबत यावे. त्यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं, असे संजय राऊत यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी कोरोनाच्या (Corona) परिस्थितीवरही भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं असून मुंबईकडून शिका सांगितलं आहे. त्याचाच अर्थ महाराष्ट्राकडून शिका, असं नमूद केलं आहे. देशाला करोनाशी लढायचं असेल तर महाराष्ट्र मॉडेलचा वापर करावा असं मी सातत्याने सांगत आहे. जर महाराष्ट्र मॉडेलचा वापर केला नाही तर देशातला करोना नियंत्रणात येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रकारे करोनाशी लढा दिला जात आहे त्याची दखल अनेक राज्यं, अनेक उच्च न्यायालयं आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील घेतली आहे. मुंबई पालिकेची केलेले स्तुती ही कौतुकास्पद आहे. ज्या प्रकारे केंद्रीय आरोग्यमंत्री आणि विरोधक महाराष्ट्राच्या यंत्रणेवर टीका करत होते त्यांना सर्वोच्च न्यायालयाने मारलेली ही चपराक आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : मराठा समाजाला आरक्षण देणे ‘ठाकरे’ सरकारचे कर्तव्य, आणि ते पार पाडणारच – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button