बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली ‘या’ गोष्टीची आठवण

मुंबई :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून अभिवादन केलं आहे. फडणवीस यांनी आदरांजली अर्पण करताना बाळासाहेबांचा एक व्हिडीओ ट्विटही केला. हा व्हिडीओ शेअर करत फडणवीस यांनी बाळासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण शिवसेनेला करून दिली आहे. स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा बाणा कधीही न सोडण्याचा संदेश बाळासाहेबांनी दिला.

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, मुख्यमंत्र्यांनी अलगदपणे शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवणच बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी करून दिल्याचं दिसून येतं. तसेच आपल्या ट्विटखाली फडणवीस यांनी एक कॅप्शन लिहिले.

‘स्वर्गीय बाळासाहेब हे आमच्या सर्वांसाठी स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होतं. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वैभव म्हणून बाळासाहेबांकडे पाहता येईल. बाळासाहेब हे ऊर्जेचा स्रोत होते.

छोट्यातील छोट्या माणसाला बाळासाहेबांच्या विचाराने ऊर्जा मिळायची. आपल्या एका वाक्याने प्रेरित करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती.’ हिंदू धर्माचा भगवा झेंडा, सतत-सतत, सातत्याने आसमानात फडकत राहिला पाहिजे, असा संदेशही बाळासाहेबांनी या व्हिडीओतून दिला आहे. म्हणजेच, हिंदू धर्माची आणि भगव्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहताना केला आहे. तसेच, बाळासाहेब हे विचारांनी आणि स्मृतींनी सदैव आपल्यासोबत राहतील, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.