‘फडणवीसांकडून करेक्ट कार्यक्रमाचा पुनरुच्चार आघाडी सरकारसाठी गर्भित इशारा- आशिष शेलार

Mahavikas Aghadi-Ashish Shelar

मुंबई :- अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. भालके यांच्या विजयासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मैदानात उतरले होते. तसेच तीन पक्ष एकत्र आल्याने कोण मायचा हरवू शकत नाही, असे थेट आव्हान अजित पवार यांनी भाजपला दिले होते. आणि याच मुद्द्यावरुन भाजपने अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंढरपूरच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आत अजित पवार राजीनामा देणार का? असा सवाल भाजपचे आमदार आणि प्रवक्ते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विचारला आहे.

आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेनेचाही समाचार घेतला. ते म्हणाले, बेळगाव असो किंवा बंगाल यावर बोलण्याची संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिवसेनेची औकात नाही आहे. जे स्वत: कुबड्यांवर आहेत, ज्यांचं सरकार कुबड्यांच्या आधारावर उभं आहे आणि ज्यांचं पहिलं पाऊल ही कुबड्यांच्या आधाराशिवाय पडू शकत नाही, अशा पक्षाने दुसऱ्याबद्दल बोलणं आणि दुसऱ्या पक्षाच्या यशाबद्दल बोलण्याची शिवसेनेची औकातच नाही आहे, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला.

राजकारणात यशाची भाषा करायची असेल तर एकटे यावे नाही तर कोणाला घेऊन यावे भाजप कोणाला घाबरत नाही. बंगालमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. ममता बॅनर्जींना आम्ही त्यांना पराभूत करू शकलो नाही हे खरं आहे. आम्हला पूर्ण विजय मिळाला नाही, पण यशाचे मोजमाप फक्त भाजपकडेच आहे. जितेंद्र आव्हाड जर अदृश्य शक्ती बद्दल बोलले असतील तर त्यांची काळजी काँग्रेसने करावी. या अदृश्य हातांमुळेच काँग्रेस भूईसपाट झाली. त्यामुळे नेमका आनंद बॅनर्जीच्या विजयाचा आहे की काँग्रेस भुईसपाट झाल्याचा आहे, हे आव्हाडांनी स्पष्ट करावे, असे शेलार म्हणाले.

यावेळी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला. सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांना सुरक्षेची गरज होती म्हणून त्यांना केंद्राने सुरक्षा प्रदान केली. त्यांच्याकडून सुरक्षेची मागणी केली गेली होती हे बहुतेक नाना पटोलेंना माहिती नसावं. कुठलीही माहिती नसताना उचलली जीभ लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. महाराष्ट्राला मोठ्याप्रमाणात लसीचा आणि रेमडीसिवीर इंजक्शनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र ज्यांचं आयुष्य कालाकांडीत गेलं त्यांना काळ्याबाजाराची माहिती असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी देवेन्द्र फडणवीस आपल्या करेक्ट कार्यक्रमाच्या विधानावर ठाम असून तो कधी होणार असा प्रश्न विचारला असता शेलार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी करेकस्ट कार्यक्रम करण्याबाबत केलेले विधान महाविकास आघाडी सरकारसाठी गर्भित इशारा आहे, ते कुठलीही विधान विनाकारण करत नाही, योग्यवेळी ते नक्कीच करेक्ट कार्यक्रम करतील, असा विश्वासही त्यानी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button