फडणवीस-राऊत भेट झाली आता युती पुन्हा होणार का?

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांच्या दीर्घ भेटीनंतर आता चर्चा सुरू झाली आहे की भाजप-शिवसेना एकत्र येतील का? आलेत तर काय होईल? दोघांमध्ये केवळ सामनात मुलाखत घेण्यावरून अडीच तास चर्चा झाली असेल यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, बसू शकत नाही. कुछ तो हुआ है? कालच्या भेटीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असतील तर त्यात फायदा कोणाचा होईल? अर्थात १०५ आमदार असलेल्या भाजपला मुख्यमंत्रीपद मिळेल. शिवसेनेला आधीच्या फडणवीस सरकारपेक्षा सत्तेत जास्त वाटा मिळेलच. अगदीच भाजपइतकी मंत्रिपदे मिळणार नाहीत पण गेल्यावेळी बाराच मंत्रिपदे होती ती संख्या यावेळी १६ ते १८ वर नक्कीच जाईल. उपमुख्यमंत्रीपदही मिळेल. कोणाला किती मंत्रिपदे मिळतील हा विषय सोडा पण शिवसेनेचे राजकीय नुकसान होण्यापासून वाचेल. शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपद जाईल पण शिवसेनेला राजकीयदृष्ट्या संपवायला निघालेल्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले जाईल.
हिंदुत्ववादी मराठी मतदार ही शिवसेनेची खरी ताकद आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने घरोबा केल्यापासून ही ताकद ओसरू लागली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, अमरावती विभागातील शिवसैनिकांच्या भावना जाणून घ्या. ‘आम्ही वर्षानुवर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांशी पंगा घेऊन राजकारण केलं आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायला अवघड जातेय. उद्या नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यावर यांच्या जयजयकाराची भाषणं स्टेजवरून द्यायची का, असा सवाल शिवसैनिक करतात. उद्धवजींनी मुख्यमंत्रीपद मिळविले पण कार्यकर्त्यांची अडचण केली अशी भावना खाली आहे. भाजप हाच आमचा नैसर्गिक मित्र आहे, रुसवेफुगवे होतच राहतील पण आम्ही सोबतच गेले पाहिजे अशी शिवसेनेत भावना आहे. या भावनेची दखल घेऊन शिवसेनेने भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कालच्या भेटीद्वारे केलेला दिसतो.
कालच्या भेटीने भाजपप्रेमींमध्ये मात्र काहीशी अस्वस्थता आहे. ज्या संजय राऊतांनी आम्हाला इतक्या शिव्या घातल्या त्यांच्याशी अडीच तास चर्चा कशासाठी असा सवाल बरेच लोक करीत आहेत पण फडणवीस चाणाक्ष आहेत. संजय राऊत यांच्यासारख्याला फडणवीस यांच्याकडे अखेर जावे लागले यामागची मजबुरी समजून घेतली पाहिजे. कंगना राणावत, सुशांतसिंह, ड्रग्ज प्रकरणानंतर शिवसेना अडचणीत आली आहे. आता या अडचणीतून सुटका करून घ्यायची असेल तर शरद पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण कामाचे नाहीत, फडणवीसच मदत करू शकतात हे लक्षात आल्याने राऊत त्यांच्या भेटीला गेले असे मानण्यासाठी बरीच जागा आहे. फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेणे यात त्यांची मजबुरी नाही पण ज्या फडणवीसांना ठोकण्याची एकही संधी गेले आठ-दहा महिने सोडली नाही, ज्यांना हिणवण्यासाठी वाट्टेल त्या शब्दांचा वापर केला त्या शिवसेनेच्या नेत्यांना राज्यात स्वत:ची सत्ता असताना, मुख्यमंत्रीपद स्वत:कडे असताना फडणवीस यांची भेट घ्यावी लागावी हा शिवसेनेच्या मजबुरीचा भाग आहे. सर्व सत्तासूत्रे आमच्याकडे आहेत आणि राजकारण आम्हाला फडणवीसांनी शिकवू नये असे उद्दामपणे सांगणाऱ्या संजय राऊतांनाच फडणवीस यांची भेट घ्यावी लागावी ही नियतीने मारलेली चपराक आहे.
सत्तेच्या नादापायी स्वत:चा हिंदुत्ववादी चेहरा हरवत चाललेल्या शिवसेनेला काहीशी उपरती झालेली दिसते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच हा प्रयत्न राहील की राज्यातील दुसरा प्रादेशिक पक्ष असलेली शिवसेना वाढू नये. म्हणूनच ठिकठिकाणी शिवसेनेची माणसं गळाला लावण्याचे किंवा शिवसेनेची कोंडी करण्याचे काम राष्ट्रवादीकडून सुरू झाले आहे असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर परत एकदा जुन्या मित्र पक्षाला हाक देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून फडणवीस-राऊत भेटीकडे बघितले जात आहे. माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनीही दिल्लीत दोन-चार दिवसांपूर्वी बऱ्याच भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. कालच्या फडणवीस-राऊत भेटीला जोडून त्या भेटींकडेही बघितले जात आहे.
उद्या राज्यात भाजप-शिवसेना एकत्र आले तर सध्याचे सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. अजूनही विधानसभा निवडणुकीला चार वर्षे दोन महिने आहेत. सध्याच्या कोरोना काळात राज्याची आर्थिक कोंडी झाली आहे. केंद्र सरकारच्या भक्कम आर्थिक मदतीशिवाय राज्याचा गाडा हाकणे कठीण असल्याची कल्पना एव्हाना राज्यातील सत्ताकर्त्यांना नक्कीच आली असणार. कंगना असो की राज्याची आर्थिक स्थिती, स्वत:चा हातून निसटता असलेला हिंदुत्वाचा बेस असो की युवराजांचा बचाव करणे असो आजच्या परिस्थितीत भाजपच्या मदतीशिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यानेच की काय संजय राऊत यांना फडणवीस यांची भेट घ्यावी लागली हा या भेटीचा अर्थ आहे. त्यातून उद्या दोन पक्षांची सत्ता येईल हे आताच दावे के साथ सांगणे कठीण आहे पण कुठेतरी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा दरवाजा नक्कीच किलकिला झाला आहे.