फडणवीस ,राऊत भेट : शिवसेनेचं मतपरिवर्तन, शरद पवार चिंतेत, तर काँग्रेस तठस्थ

Devendra Fadnavis - Sanjay Raut - Balasaheb Thorat - Sharad Pawar

नागपूर : २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिवसेना आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार सभाही घेतल्या. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपसह शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार सभाही घेतल्या. या प्रचार सभेत दोन्ही नेत्यांकडून युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन. महाराष्ट्रातील जागरुक नागरिकांनी युतीच्या अपेक्षेप्रमाणे कौलही दिला. युतीच्या बाजूने बहुमत असूनही ऐन वेळेवर शिवसेनेनं आपला पवित्रा बदलला. शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेबांना एक दिवस मुख्यमंत्री हा शिवसैनिक असणार असे वचन दिल्याचे वर्तमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जाहीर केले. आणि सुरू झाला सत्ता परिवर्तनाचा घाट. त्यानुसार शिवसेनेचे (Shiv Sena) मुख्य नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि देशाचे जाणकार नेते राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात भाजपला (BJP) सत्तेपासून दूर करण्याचा निर्णय झाला.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्तेसाठी मोठी पराकाष्ठा केली. एकेकाळी विदेशी बहू म्हणणारे पवारांनी सत्तेसाठी विदेशी बहुसोबत चर्चा करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याची संधी दिली. मात्र ही चर्चा होत असतांना मंत्रिपद वाटपात थोडाफार गैरसमज झाला. शेवटी भाजपाला महाराट्रातून बेदखल करण्यासाठी शिवसेनेनं माघार घेत राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) वाट्याला अत्यंत महत्वाचे विभाग दिले. आणिसुरु झाली वर्चस्वाची लढाई.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना महत्व देत त्यांच्या कामांना आधी प्राथमिकता देण्यात येते, अशी ओरड शिवसेनेच्या अनेक आमदारांनी केली. सर्व आमदारांच्या समस्या सोडवल्या जातील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना देण्यात आली. पण अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या बारामतीत लक्ष्य केंद्रित केलेआहे.. शिवाय महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी कोरोनासाठी रुग्णांसाठी लागणारे महत्वाचे इंजेक्शन्स केवळ आपल्या पक्षातील आमदारांच्या मतदार संघात उपलब्ध केले आहेत.

राज्याचा विकास तर सोडा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनापासून राज्यातील जनतेला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. एकीकडे शिवसेनेच्या गढात म्हणजेच कोकणात आरोग्य यंत्रणेचे धिंदवडे निघाले. तर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पुण्यात आरोग्य यंत्रणेचे योग्य काम सुरू आहे.. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची दुसरी लाट येणार, अशी शक्यता वर्तवली आहे. आधीच सरकारची तिजोरी पूर्णपणे रिकामी असलेल्या महाराष्ट्राची चिंता म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता दोन ते तीन दिवसात आणखीनच वाढली आहे. शिवसेना प्रमुखांना दिलेला शब्द पाळण्यासाठी अवैचारिक पक्षसोबत गेलेले उद्धव ठाकरे आता अधिकच चिंताग्रस्त झाले आहे. एकेकाळी बाळासाहेबांची शिवसेना कोणालाही भीक घालत नव्हती, तीच शिवसेना आता पवारांच्या एका आदेशाने बैठकीला आणि तेही मुख्यमंत्री म्हणून वेळेत हजर राहत आहे.

मात्र आता शिवसेनेला आपली चूक झाल्याची उपरती आली आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राची मदत हवी आहे.केंद्रातील भाजप सरकारने कितीही मदत केली तरी, जोवर समन्वय (युती सरकार) असणार नाही तोपर्यंत काहीही करू शकत नाही, याची जाणीव आता शिवसेनेला झाली असावी. त्यामुळेच जुने असलेले मित्र पुन्हा एकत्र येऊ शकतात का? याची चाचपणी काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन घेतल्याची चर्चा आहे.

राऊत आणि फडणवीसांच्या भेटीमुळे सर्वात जास्त घालमेल झाली ती म्हणजे राष्ट्रवादीत. सर्व सुरळीत म्हणजे सरकारमध्ये ( जनतेमध्ये नाही). चालले असतांना राऊतांनी अचानक फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली. काल ( शनिवार) दिवसभर याच घडामोडींची चर्चा रंगली. दिवसभर राजकीय भुकंम्पाची चर्चा होती. अखेर रात्री उशिरा खुद्द राऊतांनी याबाबत स्पष्टीकरण देत ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी झाल्याची ग्वाही दिली.

परंतु आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने चर्चेसाठी निरोप धाडला. मात्र मुख्यमंत्र्यांनीही त्यांना तातडीने नव्हे तर काही वेळेचा अवधी दिला. त्यानुसार आज वर्षावर आज दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. मात्र ही बैठक कुठल्या विषयावर झाली याची माहिती गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे शरद पवार कुठल्याही मात्तबर नेत्यांना भेटीसाठी आदेश देतात, ते आज वेळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले यामागे काहीतरी घडतंय असं दिसून येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने कुठलेही प्रतिक्रिया न दिल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे.

विजय गावंडे

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER