‘राजकीय भूमिकेमुळेच फडणवीसांचा लॉकडाऊनला विरोध; उद्या मोदींनीच देशव्यापी लॉकडाऊन केला तर काय कराल? संजय राऊत

Sanjay Raut - Devendra Fadnavis

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चर्चा रंगल्या आहेत . महाराष्ट्रात लॉकडाऊन (Lockdown) करण्यास देवेंद्र फडणवीस यांचा असलेला विरोध हा भाजपच्या राजकीय भूमिकेमुळे आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे सध्या केंद्र सरकार स्वत:च्या पक्षाचा स्वार्थ पाहत आहे. मात्र, उद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीच देशव्यापी लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली तर तेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काय करणार? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा, असं फडणवीस मोदींना सांगतील का, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील कोरोना परिस्थितीचं पुरेसं गांभीर्य नसल्याची टीका केली. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात लॉकडाऊन लागू करावा लागेल का, याचा विचार झाला पाहिजे. मात्र, केंद्र सरकार प्रत्येकवेळी आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहून निर्णय घेते. तुमचे लोक प्रचार करत आहेत किंवा निवडणुका आहेत म्हणून माणसं मारता येणार नाही. निवडणुका आणि राजकारणापेक्षा लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. त्याठिकाणी कोरोना नाही, असे नव्हे. थोड्याच दिवसांत भयावह परिस्थिती समोर येईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन नको, अशी भूमिका मांडली. लोकांना लॉकडाऊन नको, असे त्यांनी सांगितले. हे अगदी योग्य आहे. मात्र, ही गोष्ट सरकारलाही माहिती आहे. पण मग लोकांचे जीव वाचवण्याचा दुसरा पर्याय फडणवीसांकडे आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button