‘फासा आम्हीच पलटणार’, सत्ताबदलाबाबत फडणवीसांचे सूचक विधान

ठाणे : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात सत्ताबदलाचे संकेत दिले आहेत. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मीरा भाइंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी (Dedication of Fire Turn Turn Ladder) देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं.

यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यात सर्वांत  कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत बसली आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वांत मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवू. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल, असं फडणवीस म्हणाले. यावेळी ठाकरे सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घटनात्मकरीत्या मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख नाहीत.

तर राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारची नेमणूक करत असतात. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलताना संयमानं बोललं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. काँग्रेसनं  कुणाला अध्यक्ष करावं आणि कुणाला करू नये हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, असं सांगतानाच आता देशातच काँग्रेस शिल्लक राहिलेली नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. तसेच काँग्रेसच्या आंदोलनाचीही त्यांनी खिल्ली उडवली. अटक करवून घेण्यासाठीही काँग्रेसकडे कार्यकर्ते उरले नसल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER